शिवपाणंद रस्त्यांसाठी चाळीसगाव तहसीलदारांना शेतकऱ्यांचे निवेदन
उपसंपादक – कल्पेश महाले
चाळीसगाव – वर्षानुवर्षे शेतकऱ्यांचा शेतरस्त्यासाठी चाललेला संघर्ष थांबावा यासाठी महाराष्ट्र राज्य शिवपाणंद शेतरस्ता चळवळीमार्फत आंदोलन केले जात आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनीही तहसीलदारांना निवेदन देत शेत रस्ते तयार करून देण्याची मागणी केली.
तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सोयीसाठी शेतरस्ते तयार करून द्यावे अशी मागणी चाळीसगाव तालुका शिवपाणंद चळवळीच्या पदाधिकाऱ्यांमार्फत करण्यात आली. दरम्यान तहसीलदारांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल घेत शासनाने घेतलेला निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी परिपत्रक ग्राम शेतरस्ता समित्या स्थापन करण्याचे निर्देश ग्रामपंचायतींना देणार असल्याचे तहसीलदार प्रशांत पाटील यांनी शेतकऱ्यांना सांगितले. तर शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेतल्याने शेतकऱ्यांनीही तहसीलदारांचे कौतुक केले. यावेळी गणेश बाविस्कर, विनोद आव्हाड, हिलाल महाजन, वाल्मीक महाजन, संजय चौधरी, नंदलाल कुमावत, शिवाजी पाटील यांच्यासह अन्य शेतकरी उपस्थित होते.