पारोळा किल्ल्याच्या संवर्धनासाठी अमोलदादांचा शासनदरबारी धडाका; ‘महाराष्ट्र वैभव अभय संगोपन योजने’तून संवर्धनासाठी सकारात्मक पाऊल…!
पारोळा किल्ल्याच्या संवर्धनासाठी अमोलदादांचा शासनदरबारी धडाका; ‘महाराष्ट्र वैभव अभय संगोपन योजने’तून संवर्धनासाठी सकारात्मक पाऊल...!

इमरान शेख उपसंपादक
पारोळा : पारोळा शहराची ऐतिहासिक ओळख आणि वैभव जपणाऱ्या पारोळा किल्ल्याच्या संवर्धनासाठी आमदार मा.ॲड. अमोलदादा पाटील यांच्या पुढाकाराने शासनस्तरावरील पाठपुराव्याला वेग आला आहे. याच अनुषंगाने पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय, मुंबई येथील मुख्यालयात पारोळा किल्ल्याच्या संवर्धनासंदर्भात अत्यंत महत्वपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीस आमदार मा.ॲड. अमोलदादा पाटील, पारोळा नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील, महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक मा. डॉ. तेजस गर्गे, उपसंचालक मा. हेमंतजी दळवी, पारोळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मा. तुषारजी नेरकर, बांधकाम विभागाचे अभियंता सुमित पाटील यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पारोळा किल्ला हा शहराच्या ऐतिहासिक अस्मितेचा आणि समृद्ध वारशाचा महत्वपूर्ण ठेवा आहे. या ऐतिहासिक वास्तूचे जतन, संवर्धन व शास्त्रोक्त पद्धतीने विकास व्हावा, यासाठी आमदार अमोलदादा पाटील सातत्याने शासनदरबारी पाठपुरावा करीत आहेत. किल्ल्याच्या संवर्धनासाठी ‘महाराष्ट्र वैभव अभय संगोपन योजने’च्या माध्यमातून आवश्यक कार्यवाही करण्याच्या दृष्टीनेही बैठकीत महत्वपूर्ण चर्चा करण्यात आली.
मागील आठवड्यातच आमदार अमोलदादा पाटील यांनी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक मा. डॉ. तेजस गर्गे यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी पारोळा किल्ल्याच्या संवर्धनाचा विषय सविस्तरपणे मांडत किल्ल्याची सद्यस्थिती, आवश्यक संवर्धनाची कामे आणि भविष्यातील विकासाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या बाबी शासनाच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. त्यानंतर आज मुंबई येथील संचालनालयाच्या मुख्यालयात संबंधित अधिकारी व नगरपरिषद प्रशासनाच्या उपस्थितीत पुढील कार्यवाहीसाठी ही महत्वपूर्ण बैठक पार पडली.
बैठकीत किल्ल्याच्या संवर्धनासाठी आवश्यक प्रस्ताव शासनाकडे पाठविणे, प्रस्तावासोबत आवश्यक कागदपत्रे व तांत्रिक बाबींची पूर्तता करणे, आवश्यक कामांचा आराखडा तयार करणे, किल्ला परिसरातील विकासकामे तसेच ‘महाराष्ट्र वैभव अभय संगोपन योजने’अंतर्गत संवर्धनाच्या शक्यता तपासणे, यासह विविध विषयांवर सकारात्मक व सविस्तर चर्चा झाली.
पारोळा किल्ल्याचे ऐतिहासिक स्वरूप अबाधित ठेवत त्याचे शास्त्रोक्त पद्धतीने संवर्धन करणे, किल्ला परिसराचा नियोजनबद्ध विकास करणे आणि भविष्यात या ऐतिहासिक वास्तूला पर्यटनाच्या दृष्टीने अधिक सक्षम ओळख मिळवून देणे, या दृष्टीनेही बैठकीत विविध महत्वपूर्ण मुद्द्यांवर विचारविनिमय करण्यात आला.
तसेच संबंधित विभागांनी आवश्यक प्रस्ताव व कागदपत्रांची पूर्तता करून पुढील कार्यवाहीला गती देण्याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली. त्यामुळे पारोळा किल्ल्याच्या संवर्धनाच्या दिशेने शासनस्तरावर ठोस पावले पडण्यास सुरुवात झाली असून, आमदार अमोलदादांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या ऐतिहासिक वारशाच्या जतनाला आता अधिक बळ मिळणार आहे.
“पारोळा किल्ला हा केवळ एक ऐतिहासिक वास्तू नसून पारोळ्याच्या अस्मितेची आणि इतिहासाची साक्ष देणारा अमूल्य ठेवा आहे. हा वारसा पुढील पिढ्यांसाठी अभिमानाने जतन झाला पाहिजे,” या भूमिकेतून आमदार अमोलदादा पाटील यांचा शासनदरबारी पाठपुरावा सुरू आहे.
अमोलदादांच्या पुढाकाराने पारोळा किल्ल्याच्या संवर्धनासाठी शासन, पुरातत्व विभाग आणि नगरपरिषद यांच्यातील समन्वयाला मिळालेली ही गती निश्चितच पारोळ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी दिशा देणारी ठरणार आहे..



