नक्षत्र हॉटेल मालकाचा प्रामाणिकपणा; एक तासांतच ८५०००/- रुपयांची रोकड व मौल्यवान वस्तू असलेली प्रवाशाची बॅग केली परत.

उपसंपादक – कल्पेश महाले
चाळीसगांव – तालुक्यातील तळेगाव येथील हॉटेल नक्षत्र येथे सातारा जिल्ह्यातील आयोध्या येथे जाणारे भाविकांची रामेश्वर टुर्स ट्रॅव्हल्स चहा घेण्यासाठी काल सायंकाळी थांबली होती. त्यावेळी ट्रॅव्हल्स मधील एका भाविकाची पर्स हॉटेल नक्षत्र येथे राहिली होती हॉटेल नक्षत्रचे संचालक योगेश भिकाजी दराडे यांच्या कन्या संस्कृती दराडे यांना ती पर्स आढळून आली असता लगेच संस्कृतीने आजोबा भिकाजी दराडे यांना माहिती दिली.
यावेळी भिकाजी दराडे यांना पर्स मध्ये सातारा येथील ज्वेलर्स शॉप चे सोने खरेदीचे बिल व ८५०००/- हजार रोख रक्कम व मौल्यवान वस्तू आढळून आल्या असता भिकाजी दराडे यांनी लगेच ज्वेलर्स शॉप च्या बिलावरील मोबाईल नंबर वर संपर्क करून संबंधित ग्राहकाचे नाव सांगितले व ज्वेलर्स दुकानदाराकडून ग्राहकाचा संपर्क क्रमांक मिळविला. व शिंगटे कुटुंबीयांना कॉल करुन माहिती दिली की आमच्या हॉटेलला ट्रॅव्हल्स आली होती त्या ट्रॅव्हल्स मधील पार्वता जगन्नाथ शिंगटे यांची पर्स या ठिकाणी विसरून गेल्या आहेत, तुम्ही काही काळजी करू नका ती पर्स मी कोणत्या ठिकाणी तुम्हाला द्यायला येऊ असे भिकाजी दराडे यांनी कॉल करून सांगितले. सदर ट्रॅव्हल्स मधील भाविक भोरस फाटा, चाळीसगाव येथे रात्रीच्या जेवणासाठी थांबले होते त्या ठिकाणी जाऊन दराडे कुटुंबाने संबंधित भाविकांची पर्स प्रवासी शिंगटे कुटुंबाच्या स्वाधीन केली.
हॉटेल मालकाची माणुसकी व प्रामाणिकपणाचे दर्शन या प्रसंगातून घडले असून या रामेश्वर टूर्स ट्रॅव्हल्स मधील सर्व भाविकांनी दराडे कुटुंबाचे कौतुक केले. यावेळी शिंगटे कुटुंबाकडून दराडे कुटुंबाचा सत्कार करून प्रामाणिकपणाचे कौतुक केले.
अशीच पर्स एका वर्षांपूर्वी भाविकांची राहिली होती तेव्हा देखील नक्षत्र हॉटेलचे संचालक योगेश दराडे यांनी प्रामाणिकपणे परत केली होती. या दराडे कुटुंबाचे या प्रसंगाबद्दल सर्वत्र परिसरातून कौतुक होत आहे.