पारोळा शहरासह ग्रामीण भागाच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी आमदार ॲड. अमोलदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न…!
पारोळा शहरासह ग्रामीण भागाच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी आमदार ॲड. अमोलदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न...!

सत्यकाम न्यूज नेटवर्क
पारोळा :- बोरी मध्यम प्रकल्पावर अवलंबून असलेल्या पारोळा शहरासह परिसरातील गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आगामी काळात निर्माण होऊ नये, यासाठी आमदार मा.ॲड. अमोलदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत बोरी मध्यम प्रकल्पातून जून ते सप्टेंबर २०२६ या कालावधीसाठी आरक्षित करण्यात आलेल्या पाण्याच्या उपलब्धतेचा तसेच त्याच्या योग्य नियोजनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
यावेळी जलसंपदा विभागाकडून प्राप्त झालेल्या पत्रानुसार यंदा एल-निनो परिस्थितीचा परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याबाबत चर्चा करण्यात आली. पारोळा शहरासाठी बोरी मध्यम प्रकल्पातून आवश्यक पाणी आरक्षित ठेवण्यात आले असून आगामी काळात शहरवासीयांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.
बैठकीत पारोळा शहराबरोबरच बोरी मध्यम प्रकल्पावर अवलंबून असलेल्या ग्रामीण भागातील गावांचाही सविस्तर आढावा घेण्यात आला. उपलब्ध जलसाठा, आगामी पावसाळ्यापूर्वीची परिस्थिती, पाणीपुरवठा व्यवस्थापन आणि आपत्कालीन नियोजन यासंदर्भात सखोल चर्चा करण्यात आली. नागरिकांना नियमित व सुरळीत पाणीपुरवठा मिळावा यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश यावेळी आमदार अमोलदादा पाटील यांनी दिले.
याप्रसंगी लोकनियुक्त नगराध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, शिवसेनेचे शहरप्रमुख, गटनेते तथा नगरसेवक अमृतभाऊ चौधरी, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा नगरसेवक मनिषभाऊ पाटील, नगरसेवक तथा पाणीपुरवठा सभापती मनोजभाऊ जगदाळे, उपगटनेते तथा नगरसेवक पंकजभाऊ मराठे, मा.उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक दिपक अनुष्ठान, बोरी मध्यम प्रकल्पाचे उपअभियंता सिद्धार्थ पाटील, तामसवाडी शाखा अधिकारी प्रितम काकडे, नगरपरिषदेचे बांधकाम अभियंता सुमित पाटील, पाणीपुरवठा अभियंता संकेत कारले यांच्यासह संबंधित अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
पारोळा शहर व ग्रामीण भागातील नागरिकांना भविष्यात पिण्याच्या पाण्याची कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी एकत्रितपणे नियोजनबद्ध पद्धतीने कार्यरत असून आवश्यक त्या सर्व उपाययोजना वेळेत राबविण्यात येतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला…



