
उपसंपादक – कल्पेश महाले
धुळे – शिरपूर येथे पशुपक्षी फर्मच्या स्थळ निरीक्षणासाठी पंटर मार्फत ८ हजारांची लाच घेणारा औषध निरीक्षक किशोर देशमुखचा जामीन अर्ज न्यायालयाने शुक्रवारी फेटाळला. शिरपूर येथील एकाने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली होती. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर पंटर तुषार भिकचंद जैन याला लाच घेताना ताब्यात घेतले होते. त्यानंतर औषध निरीक्षक किशोर सुभाषराव देशमुख यालाही अटक झाली होती. ही कारवाई ११ मार्चला झाली होती. पोलीस कोठडीनंतर दोघे संशयित कारागृहात होते. देशमुखच्या जामीन अर्जावर शुक्रवारी न्या. जयश्री पुलाटे यांच्या समक्ष कामकाज झाले. यावेळी तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी स्वतः हजर होत्या. जिल्हा सरकारी वकील देवेंद्रसिंह तवर व वकील अजय सानप यांनी शासनाच्या वतीने बाजू मांडली आणि आरोपीतर्फे वकील निलेश मेहता यांनी बाजू मांडली होती. या दोन्ही पक्षाच्या युक्तिवाद अंती मा.न्यायालयाने पंटर तुषारला जामीन मंजूर केला व औषध निरीक्षक किशोर देशमुख याचा जामीन अर्ज फेटाळल्याची माहिती देण्यात आली.
याचा पुढील तपास धुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी या करीत आहेत.