उन्हातान्हात राबणारा, पावसाची आतुरतेने वाट पाहणारा, कर्ज काढून पेरणी करणारा आणि संकटातही खंबीरपणे उभा राहणारा माणूस म्हणजे शेतकरी आमदार मा अमोलदादा पाटील…!
उन्हातान्हात राबणारा, पावसाची आतुरतेने वाट पाहणारा, कर्ज काढून पेरणी करणारा आणि संकटातही खंबीरपणे उभा राहणारा माणूस म्हणजे शेतकरी आमदार मा अमोलदादा पाटील...!

एरंडोल – पारोळा व एरंडोल तालुक्यातील खरीप हंगाम २०२६ पूर्वतयारी आढावा बैठक गुरुवार, दिनांक २३ एप्रिल २०२६ रोजी एरंडोल येथील पंचायत समिती सभागृहात आमदार मा. अमोलदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या बैठकीस जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, शिवसेनेचे जिल्हासमन्वयक जगदीशदादा पाटील, तालुकाप्रमुख रविभाऊ जाधव, मा.तालुकाप्रमुख बबलू पाटील, नगरसेवक मयूर महाजन, तालुका कृषी अधिकारी दीपक आहेर (पारोळा), अरविंद शिवदे (एरंडोल), पारोळा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अमोल दुकळे, प्रगतशील शेतकरी समाधान उमरे, मल्हार कुंभार, टोळी सरपंच बाळासाहेब पाटील, धारागीर सरपंच विजयसिंग पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी व शेतकरी बांधव उपस्थित होते.
यावेळी आमदार मा. अमोलदादा पाटील यांनी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत सखोल आढावा घेत विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर अधिकाऱ्यांना जाब विचारला. बियाण्यांचा उपलब्ध साठा, खतांची कमतरता टाळण्यासाठीची उपाययोजना, बनावट बियाणे व खत विक्रेत्यांवर झालेली कारवाई, पीक विमा अर्जातील अडचणी, पर्यायी पिकांचे मार्गदर्शन, वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणशी समन्वय, नैसर्गिक आपत्तीतील पंचनाम्यांची मुदत, गावागावात कृषी सहाय्यकांची उपस्थिती आणि बाजारभाव घसरल्यास शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या योजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
“खरीप हंगाम हा केवळ शेतीपुरता मर्यादित नसून संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. खरीप चांगला झाला, तर गावात समृद्धी येते, बाजारपेठा चालतात आणि प्रत्येक कुटुंबाच्या चेहऱ्यावर समाधान दिसते. त्यामुळे ही बैठक केवळ औपचारिक नसून शेतकऱ्यांच्या भविष्यास दिशा देणारी आहे,” असे आमदारांनी स्पष्ट केले.
शेतकरी हा आपल्या देशाचा खरा कणा आहे. मात्र त्यालाच सर्वाधिक संकटांना सामोरे जावे लागते. कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी, कधी बाजारभाव घसरण, तर कधी खत-बियाण्यांची टंचाई अशा अनेक अडचणींमध्येही शेतकरी खंबीरपणे उभा आहे. त्यामुळे प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि समाज यांनी एकत्र येऊन शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
पेरणीच्या सुरुवातीपासूनच बियाणे व खतांचा पुरेसा व दर्जेदार साठा उपलब्ध राहावा, कृत्रिम टंचाई होऊ नये, काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, बनावट बियाणे विक्रेत्यांना तुरुंगात पाठवावे आणि शेतकऱ्यांच्या घामाशी खेळ करणाऱ्यांना कुठलीही माफी देऊ नये, अशा कडक सूचना आमदार मा. अमोलदादा पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
शेतकरी सुरक्षित, सक्षम आणि समृद्ध झाला तरच खरीप हंगाम यशस्वी होईल आणि त्यातूनच ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साध्य होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.



