महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा विभागीय अधिवेशन व पुरस्कार सोहळा ४ ऑक्टोबरला
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा विभागीय अधिवेशन व पुरस्कार सोहळा ४ ऑक्टोबरला

पाचोरा प्रतिनिधी :-
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, उत्तर महाराष्ट्र विभागामार्फत आयोजित विभागीय अधिवेशन आणि पुरस्कार वितरण सोहळा यावर्षी पूर्वनियोजित २७ सप्टेंबरऐवजी ४ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता पार पडणार आहे. हा भव्य सोहळा स्वामी लॉन्स, पाचोरा येथे होणार असून उत्तर महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांसाठी हा एक महत्त्वपूर्ण मेळावा ठरणार आहे.
अधिवेशनाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भूषवणार आहेत. विशेष पाहुणे म्हणून अभिनेते व खासदार डॉ. अमोल कोल्हे, राज्य मंत्री रक्षाताई खडसे, मंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास मंत्री गुलाबराव पाटील, पाणीपुरवठा मंत्री व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच अनेक आमदार व माजी आमदार उपस्थित राहणार आहेत.
पाचोरा तालुक्यात अलीकडील पावसामुळे झालेल्या नुकसानीची दखल घेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन लाखांचा विमा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणार आहे.
अधिवेशनात पत्रकारितेतील उत्कृष्ट कार्याचा गौरव, संघटनेच्या विविध धोरणांवर चर्चा, तसेच पत्रकारांना ऑफिस बॅगचे वाटप करण्यात येणार आहे. यासाठी सर्व सदस्यांनी आपल्या संघटनेचे ओळखपत्र (ID कार्ड) सोबत आणावे, असे आवाहन पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
या सोहळ्याद्वारे पत्रकारांमध्ये एकात्मता वाढवणे, पत्रकारितेच्या मूल्यांची जपणूक करणे आणि संघटनेची बांधिलकी अधिक मजबूत करणे हा अधिवेशनाचा प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.