CCTV आणि गोपनीय माहितीच्या आधारे कासोदा पोलिसांचा दणका; मध्यप्रदेशातील चोरट्यांकडून 47,630 रुपये हस्तगत…!
CCTV आणि गोपनीय माहितीच्या आधारे कासोदा पोलिसांचा दणका; मध्यप्रदेशातील चोरट्यांकडून 47,630 रुपये हस्तगत...!

इमरान शेख उपसंपादक
कासोदा,येथे दि. 10/08/2026रोजी : कासोदा शहरातील साडी दुकानातून चोरी झालेल्या 47,630 रुपयांची संपूर्ण रक्कम कासोदा पोलिसांनी CCTV फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या काही दिवसात हस्तगत केली आहे. मध्यप्रदेशातील दोन आरोपींना ताब्यात घेऊन चोरीची रक्कम मूळ तक्रारदार महिलेला परत करण्यात आली.
नेमके काय घडले?
दिनांक 21/07/2026 रोजी सकाळी सुमारे 10.00 वाजता आशाबाई बाबुलाल देवरे, वय 50 वर्षे, रा. सोनबर्डी ता. एरंडोल या कासोदा शहरातील एका दुकानात साडी खरेदीसाठी गेल्या होत्या. साडी पाहत असताना त्यांच्याकडील रोख रक्कमेची पिशवी दुकानातील बाकड्यावर ठेवली होती. त्याचवेळी अज्ञात चोरट्याने संधी साधून पिशवीतील रोख 47,630/- रुपये लंपास केले. याप्रकरणी कासोदा पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 109/2026, BNS कलम 303(2)अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
CCTV आणि पथकाच्या सतर्कतेने आरोपी जेरबंद
गुन्ह्याचा तपास करताना CCTV फुटेजचे बारकाईने विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे निखिल सिसोदिया व आलोक सिसोदिया, रा. सासी कडिया, जि. राजगड, मध्यप्रदेश हे दोघे आरोपी असल्याचे निष्पन्न झाले.
मा. पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली API श्रीकांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने तातडीने मध्यप्रदेश येथे धाव घेतली.
पथकाने दोन्ही आरोपींचा शोध घेऊन त्यांच्याकडून चोरीस गेलेली संपूर्ण रक्कम 47,630/- रुपये हस्तगत केली.
तक्रारदार भावुक, पोलिसांचे आभार
हस्तगत केलेली संपूर्ण रक्कम आज तक्रारदार आशाबाई देवरे यांना परत करण्यात आली. चोरीची रक्कम परत मिळाल्याने त्या भावुक झाल्या आणि त्यांनी कासोदा पोलिसांचे मनापासून आभार मानून समाधान व्यक्त केले.
तपास पथक HC नंदलाल परदेशी, PC दीपक देसले, PC स्वप्नील परदेशी नेमणूक कासोदा पोलीस स्टेशन, PC हरीश परदेशी नेमणूक पाचोरा पोलीस स्टेशन.
कासोदा पोलिसांच्या जलद आणि तांत्रिक तपासामुळे चोरीचा छडा लागून नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे..



