कासोदा येथे वीज पथकाची धाड -फेरफार केलेली मीटर जप्त !
कासोदा येथे वीज पथकाची धाड -फेरफार केलेली मीटर जप्त !

एरोंडोल तालुक्यातील कासोदा येथे
8 सप्टेंबर रोजी अमळनेर येथील वीज चोरी पथकाने कासोदा शहरातील रामनगर, सेंट्रल बँक परिसरात धाड टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत काही वीज ग्राहकांनी त्यांच्या घरगुती वीजमीटरमध्ये फेरफार करून बेकायदेशीर पद्धतीने वीज वापरत असल्याचे उघडकीस आले.
पथकाने तत्काळ आठ ते नऊ जणांचे फेरफार केलेले वीजमीटर जप्त करुन धरणगाव येथील कार्यालयात जमा केले. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून गावात या प्रकरणाची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरु आहे.
सदर कारवाईदरम्यान काही अकोडेधारक बहाद्दरांवरही लवकरच कारवाई होणार असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे. वीज कंपनीच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या ग्राहकांनी मीटरमध्ये फेरफार केला आहे त्यांच्यावर ऍव्हरेज पद्धतीने वीज बिल आकारले जाणार आहे. तसेच बिलाची वसुली वेळेत न केल्यास संबंधितांवर योग्य ती दंडात्मक व कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
वीज चोरी हा गंभीर गुन्हा असून त्यामुळे वीज मंडळाचे मोठे आर्थिक नुकसान होत असते. त्यामुळे अशा प्रकारच्या कारवाया वेळोवेळी राबवून प्रामाणिक ग्राहकांवर अन्याय होऊ नये यासाठी वीज वितरण कंपनीने पुढाकार घेतल्याचे सांगितले जात आहे.