एरंडोल तालुक्यातील लाचखोर मुख्याध्यापक 3 हजार 600 रुपयांची लाच मागितल्यामुळे जळगांव एसीबीच्या जाळ्यात.

उपसंपादक – कल्पेश महाले
जळगांव – मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार निपाणे येथील हरिहर माध्यमिक हायस्कूलमध्ये कार्यरत आहेत. तक्रारदाराच्या पत्नीचे 23 हजार 815 रुपये इतके वैद्यकीय बिल होते आणि हे बिल मंजूर होण्यासाठी या कर्मचाऱ्याने शाळेचे मुख्याध्यापक संदीप महाजन यांच्याकडे सादर केले होते. दरम्यान, हे बिल आपण आपल्या ओळखीने जिल्हा रुग्णालय व वेतन अधीक्षक तसेच माध्यमिक शिक्षण विभाग यांच्याकडून मंजूर करून घेतो असे आश्वासन देत 5 हजार रुपयांची लाच मागितली.
तक्रारदार आणि मुख्याध्यापक यांच्यात तडजोडीअंती मुख्याध्यापकाला 3 हजार 600 रुपये देण्याचे ठरले. दरम्यान, या तक्रारदाराने जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार संदीप महाजन याच्यावर कारवाई करण्यात आली असून कासोदा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांच्या पथकाने केली कारवाई
जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.किशोर महाजन, पो.ना.बाळू मराठे. पो.कॉ.प्रदीप पोळ यांच्या पथकाने कारवाई केली.
सदरील मुख्याध्यापक हा दुसऱ्यांदा सापडला लाचप्रकरणात
संदीप महाजन याने यापूर्वी याच कर्मचाऱ्यााकडून वेतन निश्चितीच्या फरकाची 2 लाख 53 हजार 780 रुपये एवढी रक्कम मिळवून देण्यासाठी 12 हजार 500 रुपये लाच मागितली होती आणि तडजोडअंती 10 हजार रुपये लाच स्विकारली होती. याप्रकरणातही महाजन याच्यावर 27 जून 2024 रोजी कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.