शेतकरी सहकारी संघाच्या प्रशासकीय इमारत व व्यापारी संकुलाचा भव्य भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न..!
शेतकरी सहकारी संघाच्या प्रशासकीय इमारत व व्यापारी संकुलाचा भव्य भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न..!

इमरान शेख उपसंपादक
आबासाहेबांनी उभारलेली विश्वासाची परंपरा पुढे नेण्याची जबाबदारी आपली” — आमदार ॲड. अमोलदादा पाटील
पारोळा : पारोळा तालुका शेतकरी सहकारी संघाच्या प्रशासकीय इमारत व व्यापारी संकुलाच्या महत्त्वाकांक्षी बांधकामाचा भव्य भूमिपूजन सोहळा लोकप्रिय आमदार ॲड. अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला. शेतकरी सहकारी संघाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना अधिक सक्षम व आधुनिक सुविधा उपलब्ध करून देतानाच पारोळा शहराच्या विकासाला नवी दिशा देणाऱ्या या महत्त्वपूर्ण प्रकल्पामुळे शहराच्या विकासात निश्चितच भर पडणार आहे.
लोकप्रिय आमदार ॲड. अमोलदादा पाटील यांच्या दूरदृष्टीपूर्ण संकल्पनेतून साकारण्यात येणाऱ्या या प्रकल्पात तब्बल ३ मजली अद्ययावत इमारत उभारण्यात येणार असून, त्यामध्ये शेतकरी सहकारी संघाची प्रशासकीय इमारत, १५० हून अधिक व्यापारी संकुले, शेतकरी निवास तसेच विविध अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे शेतकरी, व्यापारी आणि नागरिकांसाठी हा प्रकल्प अत्यंत उपयुक्त ठरणार असून, पारोळा शहराच्या विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात या माध्यमातून होत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
१९६२ साली स्थापन झालेल्या पारोळा तालुका शेतकरी सहकारी संघाला मोठी ऐतिहासिक आणि गौरवशाली परंपरा लाभली आहे. संघाचे पहिले अध्यक्ष स्व. आण्णासो. कौतिकराव ओंमकारराव पाटील, तर पहिले उपाध्यक्ष स्व. दादासो. बळवंतराव दौलतराव पाटील होते. सहकारमहर्षी माजी आमदार मा. आबासाहेब चिमणरावजी पाटील यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनाखाली संघाने शेतकरी हिताला केंद्रस्थानी ठेवून विविध उपक्रम राबविले. सन १९८६-८७ पासून आजतागायत संघाचे सभासद, संस्था प्रतिनिधी, शेतकरी बांधव तसेच माता-भगिनी यांनी सातत्याने विश्वास दाखवत संघाची सत्ता एकहाती शिवसेनेच्या ताब्यात दिली आहे.
सहकारमहर्षी मा. आबासाहेब चिमणरावजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली पारोळा शेतकरी सहकारी संघाने संपूर्ण महाराष्ट्रात ज्वारी खरेदीत प्रथम क्रमांक पटकावण्याचा मान मिळवला. तब्बल १ लाख ११ हजार क्विंटल ज्वारीची खरेदी करून संघाने प्रथम पारितोषिकही पटकावले. शेतकरी हितासाठी केलेल्या या उल्लेखनीय कार्यामुळे संघाने सहकार क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
आजच्या घडीला संघाची १०८ संस्था सभासद आणि ७ हजार ३७६ व्यक्ती सभासद अशी भक्कम सभासद संख्या आहे. हजारो शेतकरी कुटुंबांचा विश्वास संपादन केलेल्या या संस्थेची विकासाची वाटचाल आता आधुनिकतेच्या दिशेने पुढे जात आहे. सहकारमहर्षी मा. आबासाहेब चिमणरावजी पाटील यांनी संघाच्या सर्वांगीण विकासाचा जो भक्कम पाया रचला, त्याच विकासाच्या विचारांना पुढे नेत लोकप्रिय आमदार ॲड. अमोलदादा पाटील सातत्याने पाठपुरावा करून संघाला नवी दिशा देण्याचे कार्य करीत आहेत.
जिल्हा बँकेसाठी ठराव देणाऱ्या संचालक मंडळ व प्रतिनिधींचा सत्कार
दरम्यान, नुकतेच जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या माध्यमातून ठराव मागविण्यात आले होते. या प्रक्रियेत आपल्या संस्थेचा ठराव देण्यासाठी विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांच्या सर्व संचालक मंडळांनी तसेच ठराव प्रतिनिधींनी अथक परिश्रम घेत सक्रिय सहभाग नोंदविला. सहकार क्षेत्रातील या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत योगदान देणाऱ्या विविध कार्यकारी सोसायट्यांच्या संचालक मंडळांसह ठराव प्रतिनिधींचा आमदार ॲड. अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते यावेळी सत्कार करण्यात आला.
सहकार क्षेत्रातील कार्यकर्ते, संस्था प्रतिनिधी आणि संचालक मंडळांनी दाखविलेल्या या सक्रिय सहभागाचे आमदार पाटील यांनी कौतुक केले. शेतकरी सहकारी संस्थांची ताकद ही त्यांच्या सभासदांमध्ये आणि संचालक मंडळाच्या एकजुटीत असल्याचे सांगत, सहकार चळवळ अधिक सक्षम करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
भूमिपूजन सोहळ्यात बोलताना आमदार ॲड. अमोलदादा पाटील यांनी शेतकरी सहकारी संघाच्या ऐतिहासिक वाटचालीचा गौरवपूर्ण उल्लेख करत सहकारमहर्षी मा. आबासाहेब चिमणरावजी पाटील यांच्या नेतृत्वाचे स्मरण केले.
ते म्हणाले, “शेतकरी सहकारी संघ हा केवळ एक सहकारी संस्थेचा भाग नाही, तर पारोळा तालुक्यातील हजारो शेतकरी कुटुंबांच्या विश्वासाचे केंद्र आहे. या संस्थेने शेतकऱ्यांच्या हितासाठी केलेले कार्य आणि मिळवलेली गौरवशाली परंपरा पुढे नेणे ही आपली जबाबदारी आहे.”
“मा. आबासाहेबांनी निष्पक्ष, पारदर्शक आणि दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वातून चार दशकांहून अधिक काळ जनतेचा विश्वास संपादन केला आहे. त्यांनी उभारलेल्या विश्वासाच्या आणि विकासाच्या परंपरेवर आजही जनतेचा ठाम विश्वास आहे. त्याच विचारांना पुढे नेत शेतकरी सहकारी संघाला आधुनिक स्वरूप देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आजच्या भूमिपूजनातून केवळ एका इमारतीची पायाभरणी होत नाही, तर शेतकरी, व्यापारी आणि पारोळा शहराच्या विकासाच्या नव्या युगाची पायाभरणी होत आहे,” असे आमदार पाटील यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, “या इमारतीमध्ये प्रशासकीय कार्यालयासोबतच १५० हून अधिक व्यापारी संकुले, शेतकरी निवास आणि आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांना संघाच्या कामासाठी येताना अधिक चांगल्या सुविधा मिळतील, व्यापारी क्षेत्राला चालना मिळेल आणि पारोळा शहराच्या विकासाला नवे बळ मिळेल. हा प्रकल्प केवळ बांधकामाचा नसून भविष्यातील पारोळ्याची नवी ओळख निर्माण करणारा प्रकल्प ठरेल.”
यावेळी संघाचे अध्यक्ष भैय्यासाहेब पाटील यांनी प्रास्ताविकातून शेतकरी सहकारी संघाच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या गौरवशाली वाटचालीचा आढावा घेतला. संघाच्या माध्यमातून शेतकरी हितासाठी करण्यात आलेल्या विविध कार्यांची माहिती देतानाच आगामी काळात संघाला अधिक आधुनिक, सक्षम आणि शेतकरीकेंद्री स्वरूप देण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एरंडोल युवासेनेचे माजी तालुकाप्रमुख बबलूदादा पाटील व तालुकाप्रमुख कमलेश पाटील यांनी प्रभावीपणे केले.
याप्रसंगी अमळनेर विधानसभेचे मा. आमदार कृषिभूषण साहेबरावदादा पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख, गटनेते तथा नगरसेवक प्रा. मनोजभाऊ पाटील, उपजिल्हाप्रमुख तथा नगरसेवक मनिषभाऊ पाटील, पारोळा नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, जि.प. मा. उपाध्यक्ष ज्ञानेश्वरनाना आमले, जि.प. मा. कृषि सभापती डॉ. दिनकर पाटील, शेतकी संघाचे मा. अध्यक्ष चतुरभाऊसाहेब पाटील, पंडीतबापू पाटील, विजूआबा पाटील, पारोळा नगरपरिषदेचे मा. नगराध्यक्ष दयारामअण्णा पाटील, एरंडोल पंचायत समितीचे मा. सभापती अनिलभाऊ महाजन, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक जगदीशदादा पाटील, शिवसेनेचे विधानसभा क्षेत्रप्रमुख सुदामतात्या राक्षे, पारोळा तालुकाप्रमुख मधुकरआबा पाटील, पारोळा शिवसेनेचे शहरप्रमुख, गटनेते तथा नगरसेवक अमृतभाऊ चौधरी, देवगांव सरपंच समिरदादा पाटील, चाळीसगांव बाजार समिती सभापती किशोर पाटील, धरणगांव बाजार समितीचे मा. उपसभापती किरण पाटील, संचालक देविदास चौधरी सर, एरंडोल शेतकी संघाचे मा. अध्यक्ष संभाजी चव्हाण, पारोळा शेतकी संघाचे उपाध्यक्ष प्रकाश पाटील, मा. उपाध्यक्ष प्रकाशनाना पाटील, शेतकी संघाचे संचालक डॉ. निलेश पाटील, साहेबरावदादा पाटील, सचिन पाटील, गणेश पाटील, दिपक खरे, भैय्यासाहेब पाटील, प्रमोद जाधव, राहुल चव्हाण, सुभाषआप्पा पाटील, सुरेश पाटील, मा.उपनगराध्यक्ष सुदामबापू चौधरी, पारोळा नगरपरिषदेचे प्रतोद तथा नगरसेवक नितीनभाऊ सोनार, भाजपा गटनेते तथा नगरसेवक धीरजजी महाजन, नगरसेवक राजूबापू पाटील, छोटू पाटील, बापू मिस्तरी, विनोद पाटील, नजीरखान बेलदार, दिपकदादा अनुष्ठान, भूषणभाऊ टिपरे, इमरान शेख, एरंडोल नगरपरिषदेचे नगरसेवक आनंदभाऊ दाभाडे यांचेसह एरंडोल विधानसभेतील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, शिवसेना-युवासेनेचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य, शिवसैनिक, पत्रकार, संघाचे पदाधिकारी, संचालक, संस्था प्रतिनिधी, सभासद, शेतकरी बांधव, व्यापारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकरी सहकारी संघाच्या गौरवशाली ऐतिहासिक परंपरेला आधुनिक विकासाची जोड देणाऱ्या या भव्य प्रकल्पाचे भूमिपूजन झाल्याने पारोळा तालुक्यातील सहकार क्षेत्रासह शेतकरी व व्यापारी बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांच्या विश्वासाचा हा ऐतिहासिक वारसा आता आधुनिक सुविधांच्या माध्यमातून विकासाच्या नव्या पर्वाकडे वाटचाल करीत असून, भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने पारोळा शहराच्या विकासाला नवी दिशा मिळणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.



