उपसंपादक – कल्पेश महाले
चाळीसगाव (दि.२८) : चाळीसगाव येथील आजवरच्या सर्व गर्दीचे उच्चांक मोडीत काढत भारतीय जनता पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार आणि विद्यमान आमदार मंगेश चव्हाण यांनी आज हजारो जनसमुदायाच्या साक्षीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याप्रसंगी राज्याचे ग्रामविकास व पर्यटनमंत्री गिरीश महाजन, खासदार स्मिताताई वाघ, पारोळा येथील आमदार चिमणराव पाटील, पाचोरा येथील आमदार किशोर आप्पा पाटील, माजी आमदार साहेबराव घोडेसर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार, शिवसेनेचे उमेश (पप्पूदादा) गुंजाळ, एकलव्य संघटनेचे अध्यक्ष पवनराजे सोनवणे, भाजपा जनजाती मोर्चाचे प्रदेश संयोजक किशोर काळकर, धनगर समाजाचे नेते नवनाथ ढगे, जिल्हा सरचिटणीस मधुबाऊ काटे यांच्यासह महायुतीचे जिल्ह्यातील व चाळीसगाव तालुक्यातील सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आणि बघता बघता उसळला जनतेचा महासागर
शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक मैदानावर सकाळी नऊ वाजल्यापासून शहर व तालुक्यातील कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली होती आणि बघता बघता तीस हजारांहून अधिक नागरिकांनी उपस्थित राहून ही नामांकन रॅली ऐतिहासिक बनवली. तालुकाभरातील शेकडो वारकरी आपल्या पोशाखात टाळ मृदंगासह उपस्थित होते तर लाडक्या बहिणी यांचीदेखील उपस्थीती हजारोंच्या संख्येत बघायला मिळाली. रॅलीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून होऊन सावरकर चौक, गणेश रोड, शिवाजी महाराज चौक मार्गे रेल्वे पुलावरून प्रशासकीय इमारत या ठिकाणी पोहोचल्यावर रॅलीचे विराट सभेत रुपांतर झाले होते. तत्पूर्वी आमदार मंगेश चव्हाण यांनी चाळीसगाव तालुक्याचे भाग्यविधाते स्वर्गीय रामराव जीभाऊ, राजमाता अहिल्यादेवी होळकर, शिवाजी घाटावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक, संताजी जगनाडे महाराज यांचे स्मारक, स्वातंत्र्यवीर सावरकर चौक येथे जाऊन अभिवादन केले.
शहरातील सर्वसामान्य नागरिक व व्यापारी वर्गाकडून रॅलीवर पुष्पवृष्टी आणि नाश्ता वाटप
आमदार मंगेशदादा चव्हाण, प्रतिभाताई चव्हाण यांच्यासह संपूर्ण कुटुंब रॅलीत सहभागी झालेले यावेळी पहायला मिळाले. आकर्षक फुलांनी सजवलेल्या ट्रकवरुन आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी सर्व जनतेला अभिवादन केले. विराट जनसमुदाय उपस्थित असल्याने संपूर्ण शहरात भाजपमय वातावरण दिसत होते. चाळीसगाव शहरातील नागरिकांकडून या रॅलीचे ठिकठिकाणी उस्फुर्त स्वागत करण्यात आले तर ठिकठिकाणी सर्वसामान्य चाळीसगावकर व व्यापारी वर्गाकडून रॅलीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. ठिकठिकाणी उपस्थित जनतेकडून रॅलीतील सहभागी नागरिकांसाठी पिण्याचे पाणी तसेच नाश्त्याची सोय करुन देण्यात आली होती.
मतदारसंघाच्या विकासासाठी धडपडणारा मंगेश चव्हाण यांच्यासारखा होणे सोपे नाही – मंत्री गिरीश महाजन
आमदार मंगेश चव्हाण यांची पक्षाने केलेली निवड अतिशय सार्थ ठरली असून पहिल्याच टर्म मध्ये त्यांनी केलेले विकास कामे निश्चितच प्रत्येक आमदाराला हेवा वाटावा असेच आहेत, विकासासाठी धडपड व विकास कामांसाठी मंत्रालयात टेबल टू टेबल फिरणारा आमदार मंगेश चव्हाण होणे सोपे नसल्याची भावना राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले आहे. आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या नामांकन रॅलीचे शेवटी सभेत रूपांतर झाले यावेळी सभेत संबोधन करताना मंत्री महाजन बोलत होते. ज्यांना संधी दिली त्यांनी शहराला मागे नेण्याचे काम गेल्या दहा वर्षांमध्ये केले, मात्र मंगेश दादा चव्हाण यांनी हा सर्व बॅकलॉग भरून काढला असल्याचेही मंत्री गिरीश महाजन म्हणाले. यावेळी खासदार स्मिताताई वाघ व आमदार चिमणआबा पाटील यांनीही मंगेश दादा यांचे तोंड भरून कौतुक केले व प्रचंड मतांनी विजयी होणार असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला.
आणि निवडणूक घेतली जनतेनेच आपल्या हातात
आमदार चव्हाण यांच्या नामांकन रॅलीच्या सुरुवातीला तालुक्यातील विविध पक्षातील शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि कमळ हाती घेतले. यावेळी उपस्थित नेत्यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करत आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडला. एकंदरीत हि निवडणूक आता जनतेनेच हातात घेतल्याचे चित्र यावेळी निर्माण झाले होते.
सकाळची सुरुवात आईवडिलांच्या आशिर्वादाने
विधानसभा निवडणुकीसाठी चाळीसगाव मतदारसंघातून आमदार मंगेश चव्हाण हे उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सकाळी आमदार चव्हाण यांनी विठ्ठल रुक्माई स्वरूप म्हणजेच आई वडील यांचे आशीर्वाद घेतले. तसेच निवासस्थानी असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला नमन करून चाळीसगावच्या विकासासाठी बळ व ऊर्जा मिळावी अशी प्रार्थना केली. यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांच्या कुटुंबीयांनी तसेच लाडक्या बहिणींनी औक्षण केले.