भुईकोट किल्ल्याच्या देखभाल व संवर्धनाची जबाबदारी पारोळा नगरपरिषदेकडे वर्ग करण्यासाठी आमदार ॲड. अमोलदादा पाटील यांचा पुढाकार…!
भुईकोट किल्ल्याच्या देखभाल व संवर्धनाची जबाबदारी पारोळा नगरपरिषदेकडे वर्ग करण्यासाठी आमदार ॲड. अमोलदादा पाटील यांचा पुढाकार...!

इमरान शेख उपसंपादक
मुंबई : महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारशाचे जतन व संवर्धन करताना पारोळा शहरातील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याला पर्यटनाच्या दृष्टीने नवी ओळख मिळावी, तसेच किल्ल्याचे दीर्घकालीन संवर्धन व देखभाल योग्य पद्धतीने व्हावी, यासाठी एरंडोल विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा.ॲड. अमोलदादा पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. याच अनुषंगाने आज मुंबई येथे महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाचे संचालक डॉ. तेजसजी गर्गे यांची आमदार ॲड. अमोलदादा पाटील यांनी भेट घेत सविस्तर चर्चा केली.
महाराष्ट्र शासनाच्या दिनांक १७ ऑक्टोबर २०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये “महाराष्ट्र वैभव अभय संगोपन योजना” अंतर्गत पारोळा नगरपरिषद हद्दीतील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याची देखभाल, दुरुस्ती व संवर्धनाची जबाबदारी पुरातत्त्व विभागाकडून पारोळा नगरपरिषदेकडे वर्ग करण्याबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.
सद्यस्थितीत भुईकोट किल्ल्याच्या जतन व संवर्धनाचे काम प्रगतीपथावर असून या कामामुळे किल्ल्याचा मोठ्या प्रमाणावर कायापालट होत आहे. गतकाळात किल्ल्याचे सुशोभीकरण करण्यात आले होते; मात्र त्यानंतर त्याची योग्य पद्धतीने देखभाल व संवर्धन न झाल्याने कालांतराने किल्ल्याची मोठी दुरवस्था झाली होती. भविष्यात सध्या सुरू असलेल्या जतन व संवर्धनाच्या कामाची पुनरावृत्ती होऊ नये आणि किल्ल्याचे सातत्याने जतन व्हावे, यासाठी त्याची देखभाल, दुरुस्ती व संवर्धनाची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थेकडे असणे आवश्यक असल्याची भूमिका आमदार ॲड. अमोलदादा पाटील यांनी यावेळी मांडली.
भुईकोट किल्ल्याची जबाबदारी पारोळा नगरपरिषदेकडे वर्ग झाल्यास किल्ल्याच्या नियमित देखभालीसोबतच परिसराच्या सर्वांगीण विकासाला मोठी चालना मिळू शकते. किल्ला परिसरात पर्यटनाच्या दृष्टीने विविध विकासकामे, उद्याने, सुशोभीकरण, पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा तसेच ऐतिहासिक वारशाचे योग्य संवर्धन करता येणार आहे. यासोबतच स्थानिक युवकांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन पारोळा शहराच्या पर्यटनविकासाला नवी दिशा मिळण्यास मदत होणार आहे.
या विषयावर आमदार ॲड. अमोलदादा पाटील व संचालक डॉ. तेजसजी गर्गे यांच्यात सकारात्मक व सविस्तर चर्चा झाली. याबाबत पुढील कार्यवाहीसाठी दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी मुंबई येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, या बैठकीत भुईकोट किल्ल्याची देखभाल, दुरुस्ती व संवर्धनाची जबाबदारी पारोळा नगरपरिषदेकडे वर्ग करण्यासंदर्भात पुढील निर्णयप्रक्रियेवर चर्चा होणार आहे.
दरम्यान, यावेळी डॉ. तेजसजी गर्गे यांनी आमदार ॲड. अमोलदादा पाटील यांचे स्वागत करत ‘शिवशस्त्रशौर्यगाथा’ हे पुस्तक भेट दिले.
पारोळ्याच्या ऐतिहासिक वैभवाचे जतन करताना भुईकोट किल्ल्याला केवळ ऐतिहासिक वास्तू म्हणून नव्हे, तर पर्यटन, रोजगार आणि स्थानिक विकासाचे महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दिशेने आमदार ॲड. अमोलदादा पाटील यांच्या पुढाकारातून आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे.



