(उपसंपादक – कल्पेश महाले)
मुंबई:- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर अज्ञात तरुणांनी गोळीबार केल्याची घटना समोर अली आहे. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला आहे. वांद्रे पूर्व भागातील खेरनगर येथील राम मंदिर परिसरात ही घटना घडली असल्याचे समजते. तीन ते चार तरूणांकडून बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार केला. गोळीबार झाल्यावर बाबा सिद्दीकी यांना तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र रुग्णालयात पोहोचण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी २ आरोपींना ताब्यात घेतले असल्याचे समोर आले आहे. फटाके वाजवत असताना हा गोळीबार झाला असल्याचे समजते. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लीलावती रुग्णालयात संपर्क साधून डॉक्टरांशी बाबा सिद्दीकी यांच्याविषयी चौकशी केली आहे. दरम्यान, लीलावती रुग्णालायचा परिसर कार्यकर्ते व समर्थकांनी भरला आहे. झिशान सिद्दीकी तसेच अभिनेता संजय दत्त लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत.
कशी घडली घटना ?
बाबा सिद्धिकी ९:३० मिनिटांच्या दरम्यान कार्यालयातून बाहेर पडले. बाबा सिद्धीकी हे कार्यालयाजवळ फटाके वाजवत असताना गोळीबार झाल्याची माहिती आहे. फटाके फोडत असताना अचानक तीन जण गाडीतून उतरले, तोंडावर रुमाल बांधून हे तीन जण आले होते. त्यानंतर त्यांनी बाबा सिद्धिकी यांच्यावर तीन राऊंड फायर केले. बाबा सिद्दीकी यांच्या कार्यालयाजवळील राम मंदिराजवळ हा गोळीबार झाला. बाबा सिद्धिकी यांना एक गोळी लागल्यानंतर ते खाली कोसळले. त्यानंतर लोकांनी त्यांना लीलावती रुग्णालयात तातडीने दाखल केले. पोलीसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीसांनी २ जणांना ताब्यात घेतल्याची देखील माहिती आहे. महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांनी यावर्षी ८ फेब्रुवारीला काँग्रेस सोडली होती. दोन दिवसांनंतर, १० फेब्रुवारीला अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झाले. सिद्दीकी यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला.
काँग्रेसवर व्यक्त केली होती नाराजी
राष्ट्रवादीचे सदस्यत्व घेतल्यानंतर बाबा सिद्दीकी म्हणाले होते – काँग्रेसमध्ये मला कढीपत्त्याप्रमाणे वापरण्यात आले, ज्यांचे काम फक्त चव वाढवणे आहे. जेव्हा तुमचे ऐकले जात नाही, तेव्हा तुम्ही निघून जाता, असे मत त्यांनी व्यक्त केले होते. सिद्दीकी म्हणाले, मी ४८ वर्षे काँग्रेसशी जोडला गेलो होतो. यावेळी जीवन विस्कळीत झाले होते. मी जाड कातडीचा नाही. त्यामुळे पक्ष सोडताना वाईट वाटले. रोज रडण्यापेक्षा दूर राहणे चांगले. काँग्रेसला फक्त मते हवी आहेत. त्यांना काहीही देण्याची गरज नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली होती.
कोण आहेत बाबा सिद्दीकी?
बाबा सिद्दीकी हे मुंबई काँग्रेसचे महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक समजले जात होते. तीन वेळा ते आमदार झाले आहेत. त्याशिवाय मंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिलेय. १९९९, २००४ आणि २००९ मध्ये ते सलग तीन वेळा वांद्रे पश्चिम मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला. त्यांनी अन्न व नागरी पुरवठा, कामगार राज्यमंत्री आदी खातीदेखील सांभाळली आहेत. बाबा सिद्दीकी हे १९९२ आणि १९९७ च्या मुंबई महापालिका निवडणुकीत नगरसेवक म्हणून विजयी झाले होते. २०००-२००४ या कालावधीत काम करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने म्हाडा मुंबई बोर्डाचे अध्यक्ष म्हणून सिद्दीकी यांची नियुक्तीही केली होती. बाबा सिद्दीकी हे मुंबई काँग्रेस आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या समितीवर महत्त्वाच्या पदावर होते. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत बाबा सिद्दीकी यांचा अशिष शेलार यांनी पराभव केला होता.