Breaking
जळगावधुळेनंदुरबारनाशिकब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

अडीच तास चर्चा, सीएम गुलदस्त्यातच: अमित शहांकडे रात्री 12 वाजेपर्यंत बैठक, मुख्यमंत्र्यांचे नाव दोन दिवसांनी सांगणार

0 5 3 3 8 6

उपसंपादक – कल्पेश महाले

मुंबई – मुख्यमंत्री भाजपचाच होणार हे बुधवारीच स्पष्ट झाले. मात्र त्यानंतरच्या २४ तासांतही त्यांचे नाव गुलदस्त्यातच होते. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे व जे. पी. नड्डा यांची गुरुवारी रात्री ९.३० ते १२ वाजेपर्यंत केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी दिल्लीत बैठक घेतली. त्यात मुख्यमंत्रिपदी भाजपकडून जे नाव ठरवले जाणार आहे त्यावर चर्चा झाली. मित्रपक्षांची संमती घेतल्यानंतरच हे नाव जाहीर करण्याची भूमिका भाजपने घेतली आहे.

या बैठकीत काय निर्णय झाला हे जाहीर करण्यात आले नाही. दोन दिवसांनी केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत मुंबईत भाजपची बैठक होईल. त्यात मुख्यमंत्रिपदाचे नाव जाहीर होईल. दरम्यान, कोणते मंत्रिपद कुणाला द्यायचे यावरूनही दिल्लीच्या बैठकीत खल झाला. गृह खात्यासाठी भाजप व शिंदेसेनेत स्पर्धा आहे.

उपमुख्यमंत्रिपदाचा पर्याय शिंदे यांनी स्वीकारावाच

अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदी राहिल्यावर आता डिमोशनवर उपमुख्यमंत्रिपदावर येण्याची एकनाथ शिंदे यांची तयारी नाही. त्यामुळे मग त्यांचे पुनर्वसन कुठे करायचे, असा प्रश्न भाजपसमोर आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात शिंदे किंवा त्यांच्या मुलाची वर्णी लावावी, असा पर्याय भाजपने त्यांना दिला आहे. एकनाथ शिंदे स्वत: महाराष्ट्राच्या राजकारणापासून दूर जाऊ इच्छित नाहीत. त्यामुळे मुलाला केंद्रात मंत्रिपदाचा पर्याय ते स्वीकारू शकतात. पण शिंदेंच्या पक्षातील नेत्यांना मात्र एकनाथरावांनी उपमुख्यमंत्रिपदाचा पर्याय स्वीकारावा, असे वाटते. तसे साकडेही त्यांनी शिंदे यांना घातले आहे.

‘सत्तेबाहेर राहून नव्हे, तर सत्तेत सहभागी होऊन सरकार चालवा’ असा आग्रह गुलाबराव पाटील, दादा भुसे, शंभूराज देसाई, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, भरत गोगावले यांनी शिंदेंना केला आहे. ‘तुम्ही आमचे सर्वोच्च नेते आहात. केवळ पक्षप्रमुख म्हणून काम न करता तुम्ही सत्तेत सहभागी व्हा. सरकारमध्ये चांगल्या पदावर काम करा,’ अशी त्यांची मागणी आहे.

गृह खात्यासाठी एकनाथ शिंदेही आग्रही, अजित पवारांचा पुन्हा अर्थ खात्यावर दावा

अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदावर राहिल्यानंतर उपमुख्यमंत्री होण्यास एकनाथ शिंदे तयार नाहीत. हे पद ते आपल्या पक्षातील इतर नेत्याला देऊ शकतात. मात्र मुख्यमंत्री पद मिळत नसेल तर किमान गृह मंत्रालय तरी आमच्या पक्षाकडे द्यावे, यासाठी शिंदे आग्रही. नगरविकास खाते शिंदे यांच्या आवडीचे आहे. त्यावरही त्यांचा दावा आहे. तर सहाव्यांदा उपमुख्यमंत्री होणारे अजित पवार या वेळीही अर्थ खाते पुन्हा मिळवण्यासाठी आग्रही आहेत.

मुख्यमंत्रिपदासह गृह नगरविकास, महसूल ही खाती भाजपकडेच राहणार

मुख्यमंत्रिपदावर देवेंद्र फडणवीस यांचे नाव आघाडीवर आहे. गृह, सामान्य प्रशासन, महसूल यासारखी महत्त्वाची खातीही भाजप स्वत:कडे ठेवण्यासाठी आग्रही आहे. यापूर्वी २०१४ मध्ये फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी गृह व सामान्य प्रशासन खाते आपल्याकडे ठेवले होते. शिंदे सरकारमध्येही गृह खाते फडणवीसांकडेच होते. या वेळीही देवेंद्र फडणवीस कोणत्याही परिस्थितीत गृह खाते सोडणार नाहीत, असे संकेत आहेत.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 3 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे