कासोदा येथे नाभिक समाजाच्या सामाजिक सभागृहाचा भूमिपूजन सोहळा…!
कासोदा येथे नाभिक समाजाच्या सामाजिक सभागृहाचा भूमिपूजन सोहळा...!

इमरान शेख उपसंपादक
लोकप्रिय आमदार ॲड. अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते भूमिपूजन; अनेक दशकांची मागणी अखेर मार्गी
कासोदा, :आज दि १३ सप्टेंबर रोजी एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे नाभिक समाजाच्या सामाजिक सभागृहाच्या बांधकाम कामाचा भूमिपूजन सोहळा लोकप्रिय आमदार मा. ॲड. अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. अनेक दशकांपासून नाभिक समाजाकडून सामाजिक, सांस्कृतिक व विविध सामूहिक उपक्रमांसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, यासाठी सामाजिक सभागृहाची मागणी सातत्याने करण्यात येत होती. या मागणीला मूर्त स्वरूप मिळाल्याने समाजबांधवांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नाभिक समाज हा सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात सातत्याने आपले योगदान देणारा समाज असून, समाजातील विविध कार्यक्रम, विवाह सोहळे, बैठक, सामाजिक उपक्रम, युवक व महिला यांच्यासाठीचे कार्यक्रम तसेच विविध सार्वजनिक उपक्रमांसाठी स्वतंत्र सभागृहाची आवश्यकता होती. ही गरज लक्षात घेऊन सामाजिक सभागृहाची मागणी करण्यात आली होती. अखेर या मागणीची पूर्तता होत असून, सभागृहाच्या बांधकामाचा शुभारंभ झाल्याने समाजाच्या विकासाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे.
यावेळी बोलताना आमदार ॲड. अमोलदादा पाटील यांनी सांगितले की, समाजातील प्रत्येक घटकाला विकासाच्या प्रवाहात समान संधी मिळणे आवश्यक आहे. कोणताही समाज विकासापासून वंचित राहू नये, हीच आपली भूमिका असून, सामाजिक गरजा व स्थानिक मागण्यांना प्राधान्य देत विकासकामे मार्गी लावण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. सामाजिक सभागृह हे केवळ बांधकाम नसून समाजाच्या एकजुटीचे, सामाजिक उपक्रमांचे आणि पुढील पिढीच्या विकासाचे केंद्र ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
एरंडोल विधानसभा मतदारसंघाच्या विकासाच्या वाटचालीत मा. आमदार आबासाहेब चिमणरावजी पाटील यांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले आहे. त्यांच्या अथक परिश्रमातून आणि न्याय्य भूमिकेतून मतदारसंघातील विविध समाजघटकांच्या मूलभूत व सामाजिक गरजा जाणून घेत अनेक विकासकामे करण्यात आली. लहान-मोठ्या समाजांसाठी सामाजिक सभागृहे, दफनभूमी व स्मशानभूमींच्या सुधारणा, समाजोपयोगी सुविधा तसेच विविध सार्वजनिक विकासकामांना त्यांनी सातत्याने चालना दिली.
याच विकासाच्या विचारांचा आणि सर्वसमावेशक भूमिकेचा वारसा पुढे नेत आमदार ॲड. अमोलदादा पाटील हे मतदारसंघातील प्रत्येक समाजघटकाच्या प्रश्नांकडे सकारात्मकतेने पाहत असून, त्यांच्या मागण्या शासनदरबारी मांडून त्या मार्गी लावण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. कासोदा येथील नाभिक समाजाच्या सामाजिक सभागृहाचे काम हे त्याच सर्वसमावेशक विकासदृष्टीचे आणखी एक उदाहरण ठरले आहे.
भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने नाभिक समाजाच्या वतीने आमदार ॲड. अमोलदादा पाटील यांचे आभार व्यक्त करण्यात आले. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली मागणी पूर्णत्वास जात असल्याने समाजबांधवांनी समाधान व्यक्त करत आमदारांचे अभिनंदन केले.
या प्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, जिल्हा परिषदेचे मा.उपाध्यक्ष ज्ञानेश्वरनाना आमले, जिल्हा परिषदेचे मा.कृषि सभापती डॉ.दिनकर पाटील, जिल्हा दूध संघाचे संचालक दगडू चौधरी, शिवसेनेचे एरंडोल विधानसभा क्षेत्रप्रमुख सुदामतात्या राक्षे, पंचायत समितीचे मा.सभापती गबाजीअण्णा पाटील, युवासेनेचे मा.तालुकाप्रमुख बबलूदादा पाटील, युवासेना तालुकाप्रमुख कमलेश पाटील यांचेसह नाभिक समाजाचे पदाधिकारी, समाजबांधव, शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. सामाजिक सभागृहाचे काम दर्जेदार व वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.
कासोदा येथील या सामाजिक सभागृहामुळे नाभिक समाजाला सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी कायमस्वरूपी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार असून, समाजाच्या एकजुटीला आणि विविध सामाजिक उपक्रमांना निश्चितच बळ मिळणार आहे.



