१७ – चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषद नुकतीच संपन्न.
उपसंपादक – कल्पेश महाले
चाळीसगाव – विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत आदर्श आचारसंहितेची घोषणा दिनांक 15 ऑक्टोंबर 2024 रोजी मा. भारत निवडणूक आयोगाने केलेली आहे. त्या अनुषंगाने वृत्तपत्र प्रतिनिधींच्या मार्फत निवडणुक प्रक्रियेतील सर्व महत्वाचे टप्पे व आवश्यक माहिती मतदारांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने 17- चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री.प्रमोद हिले यांचे अध्यक्षतेखाली व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.राजेशसिंह चंदेल व सहायक निवडणुक निर्णय अधिकारी श्री.प्रशांत पाटील यांचे उपस्थितीत आज दिनांक 05 नोव्हेंबर 2024 रोजी तहसील कार्यालय,मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, धुळे रोड चाळीसगाव येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.
सदर पत्रकार परिषदेत माहिती देताना श्री. प्रमोद हिले यांनी सांगितले की, 17 चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात एकूण 3,75,011 मतदार आहेत. त्यापैकी 93,132 हे शहरी मतदार असून 2,81,879 मतदार हे ग्रामीण आहेत .यामध्ये स्त्रियांची मतदार संख्या 1,78,467 इतकी असुन पुरुष मतदार संख्या 1,96,514 आणि 30 तृतीयपंथी मतदार आहेत.तसेच 18 ते 19 या वयोगटातील 7216 मतदार हे नव मतदार असून ते या निवडणुकीत पहिल्यांदाच आपला मतदानाचा हक्क बजावतील.तसेच 90 ते 99 या वयोगटात 1448 आणि 100 वर्षांवरील 28 इतकी मतदार संख्या मतदार संघात आहे.
17 -चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात शहरी भागात 75, ग्रामीण भागात 269 असे एकूण 344 मतदान केंद्र आहेत.या निवडणुकीत एकूण 11 आदर्श मतदान केंद्र राहणार असून त्यापैकी 3 मतदान केंद्र महिला अधिकारी यांचे द्वारे संचलित,2 मतदान केंद्र दिव्यांग अधिकारी यांचे द्वारे संचलित आणि 1 मतदान केंद्र युवा अधिकारी यांच्याकडून संचलित राहणार आहेत.जास्तीत जास्त मतदारांना मतदानासाठी आकर्षित करण्याकरिता सदरची आदर्श मतदान केंद्र योजना राबविण्यात येत आहे .मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO), पर्यवेक्षक, सेक्टर अधिकारी यांच्या मार्फत तसेच स्वतः निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक अधिकारी यांनी संपूर्ण 344 मतदान केंद्रांना भेटी दिलेल्या असून तेथे उपलब्ध असलेल्या किमान आवश्यक सुविधांचा आढावा घेतलेला आहे. मतदानाचे दिवशी स्त्री-पुरुष मतदारांच्या रांगेचे व्यवस्थापन केले जाणार आहे. जेथे आवश्यक आहे तेथे उन्हापासून बचाव करण्यासाठी शेड टाकण्यात येईल, तसेच मतदानास मोठी रांग असल्यास तेथे वयोवृद्ध मतदारांना बसण्यासाठी खुर्च्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत मतदान यंत्रांसाठी अद्यावत सुरक्षा कक्ष (Strong Room) आहे व याच इमारतीच्या सभागृहात मतदान यंत्रे तयार करण्याचे कामकाज व मतमोजणी होणार आहे.
दिनांक 22 ऑक्टोंबर ते 29 ऑक्टोबर या कालावधीत एकुण 19 उमेदवारांनी 25 नामनिर्देशन पत्रे सादर केली होते. त्यापैकी 03 उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र छाननी अंती अवैध ठरविण्यात आले आहेत.एकुण 16 वैधरीत्या नामनिर्देशित उमेदवारांपैकी 8 उमेदवारांनी दि.04/11/2024 रोजी दुपारी 03:00 वाजेपावेतो माघार घेतली असल्याने सध्यस्थितीत एकुण 8 उमेदवार प्रत्यक्ष निवडणुक लढवीत आहेत. मतदानाची प्रक्रिया 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 07:00 ते संध्याकाळी 06:00 या वेळेत आणि मतमोजणीची प्रक्रिया 23 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 08:00 वाजेपासुन सुरु केली जाणार आहे.
सैन्यदलातील 1653 मतदारांसाठी ETPBS (Electronicaly Transmitted Postal Ballot System) द्वारे मतपत्रिका तयार झालेल्या असुन त्या संबंधित सैन्य दलातील मतदारांना ऑनलाईन पाठविण्यात आलेल्या आहेत.
उमेदवारांना विविध विभागांच्या परवानग्या एकाच ठिकाणी मिळाव्या यादृष्टीने एक खिडकी योजना कक्ष तहसील कार्यालय, चाळीसगाव येथे कार्यान्वित करण्यात आलेला आहे.
वृतपत्र,सोशल मिडिया यावर लक्ष ठेवण्यासाठी आचारसंहिता कक्षाची स्थापना करण्यात आलेली असुन तेथील मिडिया MCMC (Media Certification Monitoring Committee) टीम Paid News, Fake News विद्वेष पसरविणारे वक्तव्य यावर लक्ष ठेवण्यासाठी कार्यान्वित आहे.
सर्व उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे तसेच त्यांनी मतदान आणि मतमोजणी प्रतिनिधी नेमावेत. निवडणुकीचा दैनंदिन खर्च विहित नमुन्यात खर्च पथकाकडे सादर करावा असे आवाहन निवडणुक निर्णय अधिकारी यांनी केले.
85 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेले 4069 जेष्ठ मतदार आणि 2641 दिव्यांग मतदार यांच्यासाठी माननीय भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे गृहभेटीद्वारे मतदान घेण्याचे नियोजन आहे. त्या अनुषंगाने सदर सर्व मतदारांना फॉर्म नंबर 12 ड पुरविण्यात आलेला असून, त्यांची पडताळणी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आणि पर्यवेक्षक यांचे द्वारे करून मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्यासाठी सक्षम नसणाऱ्या एकुण 113 मतदार गृहभेटीद्वारे पात्र ठरविण्यात आलेले असुन दि.9 व 10 नोव्हेंबर 2024 रोजी एकुण 8 मतदान पथकांद्वारे सदर मतदारांची मतदान नोंदणी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
17-चाळीसगाव विधानसभा मतदार संघासाठी 412 BU,412 CU व 447 VVPAT मशीन प्राप्त झालेले असुन दि.12 ते 14 नोव्हेंबर या कालावधीत निवडणुक प्रक्रियेसाठी मतदान यंत्रांचे सिलिंग करण्याची कार्यवाही करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.
निवडणुक प्रक्रियेसाठी नियुक्त केलेल्या मतदान पथकांना यांना मतदान साहित्याचे वितरण दि.19 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 08:00 वाजता मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, धुळे रोड चाळीसगाव येथुन करण्यात येणार असून मतदानानंतर दि.20/11/2024 रोजी सायंकाळी 06:00 वाजेनंतर साहित्य स्वीकृती करण्यात येणार आहे.
मतदान नोंदविण्यात आलेली सर्व मतदान यंत्रे (EVM) तहसील कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, धुळे रोड चाळीसगाव येथील सुरक्षा कक्षात ठेवण्यात येणार आहेत. त्याठिकाणी CRPF/SRPF आणि राज्य पोलीस यांची सुरक्षा तैनात करण्यात येणार असुन तेथे अखंडीतपणे CCTV द्वारे निगराणी ठेवण्यात येणार आहे.
17-चाळीसगाव विधानसभा मतदार संघात एकुण 344 मतदान केंद्र आणि आणि 186 मतदानाचे ठिकाण (Polling Location) आहेत. त्यापैकी 170 मतदान केद्रांचे ठिकाणी Webcastingआणि उर्वरित 16 मतदान केंद्रांचे ठिकाणी सुक्ष्म निरीक्षक (Micro-Observer) द्वारे नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.
आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी नागरिकांकडून C -Vigil app वर 13 तक्रारी प्राप्त झालेल्या असुन त्या सर्व निर्गत करण्यात आलेल्या आहेत.
सदर मतदान प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांचे मदतीसाठी श्री.प्रशांत पाटील, तहसीलदार चाळीसगाव तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्री.अनिल बैसाणे, उप-अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तसेच श्री.प्रथमेश मोहोड, निवासी नायब तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
17 चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे एकूण 29 सेक्टर मध्ये विभाजन करण्यात आलेले असून 29 सेक्टर अधिकारी नेमण्यात आलेले आहेत. 3 राखीव सेक्टर अधिकारी नियुक्त केलेले आहेत. आचारसंहिता उल्लंघनाच्या विविध तक्रारींचे निरसन करण्यासाठी 6 भरारी पथकाची (FST) स्थापना करण्यात आलेली असून एकावेळी 3 भरारी पथके कार्यरत राहणार आहेत. सदरची कार्यवाही 24 तास सुरू असेल.तसेच निवडणूक प्रक्रियेत मतदारांना प्रलोभन देण्यासाठी किंवा आर्थिक लाभ देण्यासाठी पैसे किंवा मद्य यांची अवैध वाहतुक होऊ नये यादृष्टीने वाहनांची तपासणी करण्यासाठी एकूण तीन स्थिर सर्वेक्षण पथके (SST) स्थापन करण्यात आलेली असून ते मांदुर्णे, जामडी आणि दहिवद येथे कार्यरत राहणार आहेत. मतदानाचे दिवशी मतदान प्रक्रियेसाठी 48 एसटी बस 20 स्कूल बस 11 जीप अशा एकूण 79 वाहनांचा वापर करण्यात येणार आहे. सदर बैठकीस श्री.किरणकुमार कबाडी, पोलीस निरीक्षक चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन, श्री.राहुलकुमार पवार, पोलीस निरीक्षक चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन, श्री.प्रविण दातरे, सहा.पोलीस निरीक्षक मेहुणबारे पोलीस स्टेशन उपस्थित होते. सदरच्या पत्रकार परिषदेचे नियोजन डॉ.संदेश निकुंभ, निवडणुक नायब तहसीलदार, श्री.तुशांत अहिरे, निवडणुक महसुल सहायक यांनी केले.
संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ही कायदा व सुव्यवस्थेच्या वातावरणात व शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीने आवश्यक ते नियोजन व सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी श्री.प्रमोद हिले यांनी केले आहे.