
उपसंपादक – कल्पेश महाले
चाळीसगाव – येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठीची निवड गुरुवारी बाजार समितीच्या सभागृहात करण्यात आली. नूतन सभापती म्हणून डोण येथील बाजार समितीचे संचालक प्रदीप पाटील यांची तर उपसभापतीपदी शिदवाडीचे सरपंच शैलेंद्रसिंग राजपूत करण्यात आली.
बाजार समितीवर आमदार मंगेश चव्हाण यांची सत्ता आल्यानंतर त्यांनी सर्वांना सभापती, उपसभापतीचा मान देण्याच्या उद्देशाने नियोजन केले आहे. त्यानुसार ही बिनविरोध निवडीची प्रक्रिया राबविण्यात आली. प्रदीप पाटील यांना रवींद्र चुडामण पाटील हे सूचक तर किशोर पाटील हे अनुमोदक होते. उपसभापती शैलेंद्रसिंग पाटील यांना कपिल पाटील हे सूचक तर रवींद्र शिवराम पाटील हे अनुमोदक होते. सहाय्यक निबंधक धर्मराज पाटील निवडणूक अधिकारी म्हणून उपस्थित होते. त्यांना सहाय्यक महेंद्र गाडे यांचे सहकार्य लाभले. यावेळी संचालक मच्छिंद राठोड, वनिता पाटील, किशोर पाटील, कपिल पाटील, रवींद्र शिवराम पाटील, नवल पवार, रवींद्र चुडामण पाटील, हेमराज पाटील, राहुल पाटील, प्रभाकर जाधव, साहेबराव राठोड, प्रदीप देशमुख, नीलेश वाणी, प्रभाकर घुमरे यांच्यासह सचिव जगदिश लोधे, सहाय्यक सचिव सतीश पाटील आदी उपस्थित होते.
आमदारांकडून सत्कार नूतन सभापती प्रदीप पाटील व उपसभापती शैलेंद्रसिंग राजपूत यांची निवड होताच दोन्हींचा आमदार मंगेश चव्हाण यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. बाजार समितीच्या विकासासाठी तसेच शेतकऱ्यांसह, व्यापारी, हमाल, मापाडी बांधवांच्या हितासाठी नूतन पदाधिकारी काम करतील असा विश्वास आमदार मंगेश चव्हाण यांनी व्यक्त केला.