बोरी धरण पूर्ण क्षमतेने भरले; पारोळा तालुक्याला जलसमृद्धीची नवी आशा…!
बोरी धरण पूर्ण क्षमतेने भरले; पारोळा तालुक्याला जलसमृद्धीची नवी आशा…!

इमरान शेख उपसंपादक
पारोळा शहरासह तालुक्यातील १४ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रमुख आधार तसेच १२ गावांना सिंचनाचा लाभ देणारा तामसवाडी येथील बोरी मध्यम प्रकल्प (बोरी धरण) पूर्ण क्षमतेने भरल्याने परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. धरणामध्ये एकूण ४०.३१ द.ल.घ.मी. इतका जलसाठा उपलब्ध झाला असून, या पार्श्वभूमीवर आज धरणस्थळी लोकप्रिय आमदार मा.ॲड. अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते विधिवत जलपूजन करण्यात आले.
यावेळी आमदार अमोलदादांनी जलपूजन करून बोरी धरणातील जलसाठ्याची पाहणी केली. याप्रसंगी उपस्थित शेतकरी बांधव, ग्रामस्थ व संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधत धरणातील पाणीसाठा, पाणीपुरवठा आणि सिंचन व्यवस्थेबाबत माहिती जाणून घेतली. बोरी प्रकल्प हा पारोळा तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा जलस्रोत असून, या प्रकल्पाच्या माध्यमातून पारोळा शहरासह तालुक्यातील १४ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भागविण्यास मदत होते, तर १२ गावांतील शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळतो.
यंदा धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे आगामी काळातील पिण्याच्या पाण्याची उपलब्धता अधिक समाधानकारक राहण्यास मदत होणार असून, सिंचनासाठीही मोठा आधार मिळणार आहे. विशेषतः शेतकऱ्यांसाठी हा जलसाठा अत्यंत दिलासादायक असून, आगामी रब्बी हंगामातील पिकांसाठी उपलब्ध पाण्यामुळे शेतीला मोठी चालना मिळणार आहे. पाण्याची उपलब्धता वाढल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनाला हातभार लागण्यासोबतच ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही त्याचा सकारात्मक फायदा होणार आहे.
पारोळा तालुक्यातील शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने बोरी धरणाचे असलेले महत्त्व लक्षात घेता, धरण पूर्ण क्षमतेने भरणे ही संपूर्ण तालुक्यासाठी आनंदाची आणि समाधानाची बाब आहे. पाणी हेच शेतीच्या आणि विकासाच्या समृद्धीचे प्रमुख साधन असून, बोरी धरणातील मुबलक जलसाठ्यामुळे पारोळा तालुक्याच्या विकासाला निश्चितच नवी ऊर्जा मिळणार आहे.
यावेळी आमदार मा.ॲड. अमोलदादा पाटील यांनी उपलब्ध पाण्याचा योग्य व नियोजनबद्ध वापर करण्याचे आवाहन करत, धरणाच्या पाण्याचा जास्तीत जास्त लाभ शेतकरी आणि नागरिकांना मिळावा यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यावर भर दिला. बोरी धरणातील हा मुबलक जलसाठा पारोळा शहराच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यासोबतच तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीला नवसंजीवनी देणारा ठरणार असल्याने नागरिक व शेतकरी बांधवांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
याप्रसंगी जि.प.मा.कृषी सभापती डॉ.दिनकर पाटील, सहाय्यक अभियंता श्रेणी – १ सिद्धार्थ पाटील,
शाखा अधिकारी प्रितम काकडे, पंचायत समितीचे मा.सभापती वसंतआप्पा पाटील, दै.दिव्य मराठीचे पत्रकार विश्वासभाऊ चौधरी, मुंदाने येथील एकनाथ पाटील, संबंधित अधिकारी, कर्मचारी, विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य, लोकप्रतिनिधी, शेतकरी बांधव, तामसवाडीसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते..



