१५ हजार रुपयांची लाच स्विकारताना पारोळा पो.स्टे. चे दोन पोलीस हवालदार धुळे एसीबीच्या जाळ्यात.
उपसंपादक – कल्पेश महाले
पारोळा – तक्रारदार हे शेळावे खु. ता. पारोळा जि. जळगांव येथील रहिवासी असुन ते दि. ०७.११.२०२४ रोजी त्यांच्या मोटार सायकलने पारोळा ते धरणगांव रस्त्याने जात असतांना धाबे फाटयाजवळ ठिबक कंपनीसमोर समोरुन येणाऱ्या मोटार सायकलीस तक्रारदार यांच्या मोटार सायकलीची धडक होवुन त्यात समोरील मोटार सायकलवरील इसम जखमी होवुन मरण पावल्याने तक्रारदार यांचेविरुध्द पारोळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचा तपास पो.हवा. हिरालाल पाटील यांच्याकडे होता. त्यांनी तक्रारदार यांना पारोळा पोलीस स्टेशन येथे तपासकामी बोलावुन गुन्हयाच्या तपासात अटक होवु दयायची नसेल तर ३०,०००/- रुपये दयावे लागतील अन्यथा अटक केली जाईल असे तक्रारदार यांना सांगितले. तसेच तेथे कक्षात हजर असलेले पो. हवा. प्रविण पाटील यांनी देखील तक्रारदार यांना ३०,०००/- रुपये द्यावे लागतील, नाही दिले तर त्रास होईल असे सांगितल्याची तक्रारदार यांनी दि. २७.११.२०२४ रोजी दुरध्वनी व्दारे ला. प्र. विभाग धुळे कार्यालयास माहिती दिली होती.
आरोपी हिरालाल देविदास पाटील, पो. हवा. ब.नं. ३३७४ व प्रविण विश्वास पाटील, पो.हवा. ब.नं.२७१८, दोन्ही नेमणुक पारोळा पो. स्टे यांनी तक्रारदार यांचेकडुन तडजोडीअंती १५,०००/- रुपये लाचेची मागणी करुन सदर लाचेची रक्कम पो. हवा. हिरालाल पाटील यांनी स्विकारल्याने त्यांना रंगेहात पकडले.
त्यावरुन ला.प्र.वि. धुळे विभागाच्या पथकाने दि. २७.११.२०२४ रोजी लागलीच पारोळा येथे जावुन तक्रारदार यांची तकार घेवुन सदर तक्रारीची पडताळणी केली असता पो.हवा. हिरालाल पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे ३०,००० /- रुपये लाचेची मागणी करुन तडजोडीअंती १५,००० /- रुपये लाचेची मागणी करुन त्यांच्या मोबाईल फोन वरुन पो.हवा. प्रविण पाटील यांना फोन लावुन तक्रारदार यांचेशी बोलण्यास सांगितले. तेव्हा पो.हवा. प्रविण पाटील यांनी तक्रारदार यांना १५,०००/- रुपये पो. हवा. हिरालाल पाटील यांचेकडेस देण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे सदर लाचेची रक्कम पो. हवा. हिरालाल पाटील यांनी तक्रारदार यांचेकडुन स्विकारल्याने पो. हवा. हिरालाल पाटील यांना रंगेहात पकडण्यात आले असुन पो. हवा. प्रविण पाटील हे फरार झाले आहेत. दोन्ही आरोपीतांविरुध्द पारोळा पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल केलेला आहे.
सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक पंकज शिंदे तसेच पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, प्रविण मोरे, रामदास बारेला, प्रविण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक श्री. माधव रेडडी व वाचक पोलीस निरीक्षक श्री. स्वप्निल राजपुत यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आली असुन गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.