मुख्यमंत्र्यांच्या सहीचे नोकरीचे खोटे जॉईनिंग लेटर देणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल; दोघांना अटक.

उपसंपादक – कल्पेश महाले
चाळीसगाव – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बनावट लेटरपॅड बनवून त्यावर बनावट सही करून जॉइनिंग लेटर देवून तरुणीची फसवणुक केल्याची घटना चाळीसगाव येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी तरुणीच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील दोघांना पोलीसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. एकाचा शोध घेतला जात आहे.
मुख्यमंत्र्यांच्या सहीचे वरील बनावट नोकरीचे जॉइनिंग लेटर
तालुक्यातील रा.सायगाव येथील ह.मु. वामननगर चाळीसगाव असे या फसवणुक झालेल्या २२ वर्षीय तरुणीने याबाबत फिर्याद दिली. या तरुणीची कोतकर महाविद्यालयात ११ वी व १२ वीत शिक्षण घेत असतांना महाविद्यालयात कॅन्टींग चालवणाऱ्या सर्वेश प्रमोद भोसले याच्याशी ओळख झाली. तरुणी पुण्यात पोलीस भरतीची तयारी करीत असतांना तिने सर्वेश भोसले याला नोकरीसाठी मदत करण्यास सांगितले असता त्याने मंत्रालयात क्लार्कची नोकरी करशील का असे सांगत तरुणीकडून १०वी, १२ वीचे मार्कशीट, आधारकार्ड, बँक पासबुक, पॅनकार्ड आदी कागदपत्रे व्हॉटसअपवर मागवून रोहीत याने मी मंत्रालयातून बोलत असल्याचे सांगत तरूणीला मुलाखतीसाठी बोलावले, तेथे गेल्यावर सर्वेश भोसले याने या तरुणीला मंत्रालयात सहाव्या मजल्यावर बसवून ठेवत निघुन गेला. त्यानंतर तरुणी चौथ्या मजल्यावर आली असता तेथे सर्वेश भोसले भेटला व त्याने तुझा इन्टरव्हू झाला असून तुला घरी जॉइनिंग लेटर येईल असे सांगितले. त्यानंतरही जॉइनिंग लेटर आले नाही म्हणून तरुणीने भोसले यास विचारणा केली असता त्याने पोस्टाने जॉइनिंग लेटर टाकले आहे असे सांगितले, त्यानंतर सर्वेश हा १ जून रोजी तरूणीच्या घरी येत एक बंद लिफाफा दिला व ते जॉइनिंग लेटर असल्याचे सांगून निघुन गेला, तरूणीने तो लिफाफा फोडला असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लेटरपॅडवर जॉइनिंग लेटर होते. हे लेटर तरुणीने आपले नातेवाईक व मित्रांना दाखवले असता त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या सहीने कुठलेही नियुक्ती लेटर मिळत नाही. नियुक्ती सचिव किंवा प्रमुखांची सही असते.
त्यामुळे सदर जाईड लेटर खोटे असल्याचे तरुणीच्या लक्षात आले असता तिने सर्वेश भोसले यास विचारणा केली असता तु दररोज जॉईनिंग लेटरबाबत विचारात होती म्हणून मी ते स्वामी ग्राफीक्स, खडकी ता.चाळीसगाव येथील स्वामी मांडोळे याच्या मदतीने कॉम्प्युटरवर गुगल क्रोमवर सीएम ऑफीस लेटर महाराष्ट्र असे सर्च करून त्यावरून देवेंद्र फडणवीस यांचे लेटरपॅड व त्यांची सही कॉपी केली व त्यावर जॉइनिंग लेटरचा मजकूर कॉपी केलेल्या लेटरपॅडवर बनावट जाईनिंग लेटरपॅड तयार केले असल्याचे सांगितले. आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यावर तरुणीने चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला धाव घेतली. याप्रकरणी तरुणीच्या फिर्यादीवरून सर्वेश प्रमोद भोसले, रा.चाळीसगाव, स्वामी रणजित मांडोळे रा. खडकी व तुषार उर्फ रोहीत मधुकर बेलदार रा.तांबोळे ता.चाळीसगाव यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४) ३३६ (२), (३), (४), ३४० (२) प्रमाणे चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी हे करीत आहेत. दरम्यान या गुन्ह्यात पोलीसांनी स्वामी मांडोळे व सर्वेश भोसले या दोघांना अटक केली आहे. या दोघांना काल मंगळवारी न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.