महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान करून बंटीभाऊ चौधरी सन्मानित…
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान करून बंटीभाऊ चौधरी सन्मानित...

पाचोरा प्रतिनिधी :-
एरोंडोल तालुक्यातील कासोदा येथील सरपंच बंटीभाऊ चौधरी यांना
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे आयोजित विशेष कार्यक्रमात आज ४ ऑक्टोबर सरपंच बंटीभाऊ चौधरी यांना “आदर्श सरपंच पुरस्कार” प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार मा. आमदार दिलीपभाऊ वाघ, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे तसेच कार्याध्यक्ष निलेश सोमानी यांच्या शुभहस्ते देण्यात आला. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी चौधरी यांच्या कार्याचे कौतुक करताना कासोदा येथे विकासकामांची प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.
सरपंच बंटीभाऊ चौधरी यांनी आपल्या कार्यकाळात गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले. स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्त्यांची उभारणी, ग्रामसुरक्षा यांसारख्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या उपक्रमांना ग्रामस्थांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. ग्रामसभेच्या माध्यमातून पारदर्शक कारभार राखत लोकसहभागातून विकास घडवून आणणे ही त्यांची खास कार्यपद्धती आहे.
पुरस्कार स्विकारताना आपल्या भावना व्यक्त करताना बंटीभाऊ चौधरी म्हणाले, “हा सन्मान माझा एकट्याचा नसून संपूर्ण ग्रामस्थांचा आहे. माझ्या कार्याला साथ देणाऱ्या गावकऱ्यांचे व सहकाऱ्यांचे हे यश आहे. पुढेही गावाच्या प्रगतीसाठी अधिक जोमाने कार्य करणार आहे.”
या कार्यक्रमास संघाचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर रायसाकडा , प्रदेश सदस्य तथा उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष अबरार मिर्झा , उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष राकेश सुतार व विविध पदाधिकारी आणि पत्रकार उपस्थित होते. पुरस्कारप्राप्तीनंतर बंटीभाऊ चौधरी यांच्यावर राजकीय , सामाजिक क्षेत्रातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
कार्यक्रमाला स्थानिक मान्यवर, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी सर्व उपस्थितांनी बंटीभाऊ चौधरी यांच्या भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.