देवेंद्र फडणवीस उद्या घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ: आझाद मैदानावार होणार शपथविधी सोहळा
उपसंपादक – कल्पेश महाले
मुंबई – महायुती सरकारचा शपथविधी ५ डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता मुंबईतील आझाद मैदानावर पार पडणार आहे. देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. यावेळी अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची तर काही आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्याची निमंत्रण पत्रिका समोर आली आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ११ दिवसांनी महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा झाली. भाजपच्या विधीमंडळ पक्षाचा नेता निवडीसाठी भाजपचे केंद्रीय निरीक्षक विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत विधीमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. या बैठकीत चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. तर पंकजा मुंडे, प्रवीण दरेकर आणि रवींद्र चव्हाण, संजय कुटे यांनी अनुमोदन दिले. मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर महायुतीचे नेते यांनी नुकतेच राज्यपालांना भेटून सरकार स्थापनेचा दावा केलेला आहे.
राज्यपालांची भेट घेत सत्तास्थापनेचे दिले पत्र
महायुती सरकारचा मुख्यमंत्री कोण होणार, हा सस्पेन्स अखेर आज संपला. उद्या सरकार स्थापन होणार असून मुख्यमंत्र्यांसह दोन उपमुख्यमंत्री शपथ घेतील. यासोबतच काही आमदार देखील मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, गिरीश महाजन, आशिष शेलार, रवींद्र चव्हाण, अतुल सावे, सुधीर मुनगंटीवार, नितेश राणे, गणेश नाईक, मंगल प्रभात लोढा, राहुल नार्वेकर, अतुल भातखळकर, शिवेंद्रराजे भोसले, गोपीचंद पडळकर, माधुरी मिसाळ, राधाकृष्ण विखे पाटील, जयकुमार रावल हे आमदार मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, आदिती तटकरे आणि धर्मराव बाबा आत्राम तर शिवसेनेकडून दीपक केसरकर, उदय सामंत, शंभूराज देसाई, दादा भुसे, गुलाबराव पाटील, संजय शिरसाट हे शपथ घेतील, असे सांगण्यात येत आहे.