‘व्हॉईस ऑफ मीडिया’ चे दिल्ली येथील राष्ट्रीय अधिवेशन ठरले नवचैतन्याचा श्वास.

चार दिवसीय कार्यक्रमात चिंतन, ठराव आणि पत्रकारांसाठी नवउपक्रमांची घोषणा
उपसंपादक – कल्पेश महाले
नवी दिल्ली – भारतभरातील हजारो पत्रकारांना एकत्र आणणाऱ्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ या राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या भव्य चार दिवसीय आंतरराष्ट्रीय अधिवेशनाने देशभरातील ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ च्या पदाधिकाऱ्यांमध्ये कमालीचा उत्साह निर्माण केला आहे. दोन दिवस आंतरराष्ट्रीय चिंतन बैठक आणि दोन दिवस आंतरराष्ट्रीय अधिवेशन अशा स्वरूपात हा कार्यक्रम पार पडला. यामध्ये देशभरातील सर्व राज्यांतील प्रदेशाध्यक्ष आणि महासचिवांनी सहभाग घेतला.
या अधिवेशनात खास आकर्षण ठरले ते म्हणजे भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाचे (MSME) केंद्रीय मंत्री श्री.जितन राम मांझी यांच्या हस्ते सर्व राज्यांतील प्रदेशाध्यक्ष आणि महासचिवांना एकनिष्ठतेची शपथ देण्यात आली. हा शपथविधी सोहळा अत्यंत प्रेरणादायी वातावरणात पार पडला. देशातील प्रत्येक राज्यात पत्रकारांसाठी विशेष ‘आरोग्य भवन’ उभारण्यात येणार असून, त्यामार्फत मोफत आरोग्य तपासणी, मानसिक आरोग्य सल्ला आणि विमा योजना राबवण्यात येतील. नव्या बदलानुसार पत्रकारांना प्रशिक्षित करण्यात येणार असून, आधुनिक माध्यमातील आव्हाने पेलण्यास सक्षम बनवले जाणार आहे.
पत्रकारितेच्या नावलौकिकाला धक्का देणाऱ्या अपप्रवृत्तींविरुद्ध संघटना एकजुटीने लढा उभारणार आहे. अनेक ठिकाणी पत्रकार असल्याचे भासवून धमक्या देण्याचे प्रकार सुरू असल्याचे समोर आले असून, त्यावर आळा घालण्यासाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ पुढाकार घेणार आहे. यावेळी देशभरातल्या प्रत्येक राज्यामध्ये कोअर टीम तयार करण्यात येत आहे आणि त्या उपक्रमाचा शुभारंभ महाराष्ट्राची कोअर टीम जाहीर करून करण्यात आला. तसेच भारताची कोअर टीम देखील या अधिवेशनात जाहीर करण्यात आली. या राष्ट्रीय कोअर टीममध्ये महाराष्ट्राचे अध्यक्ष अनिल म्हस्के, मध्यप्रदेशचे दीपक शर्मा, उत्तर प्रदेशचे प्रेम पाठक, हिमाचल प्रदेशचे विकास शर्मा, हरियाणाचे बन्सीलाल पांचाल, जम्मू काश्मीरचे अक्षित महाजन, आसामच्या स्वप्ना दत्ता, नागालँडचे मॅक्स खिया, मेघालयचे कर्मलांग उरिया,वेस्ट बंगालचे सुमन गांगुली व तामिळनाडूचे बालाजी यांचा समावेश आहे. या टीमचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे, राष्ट्रीय संघटक अशोक वानखडे आणि ज्येष्ठ संपादक प्रकाश पोहरे यांनी विशेष स्वागत केले. ही टीम भारत देशात संघटनेच्या विविध उपक्रमांचे निर्णय घेईल.
या अधिवेशनात दोन दिवसांच्या चिंतन सत्रांमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा झाली आणि काही महत्त्वाचे ठराव पारित करण्यात आले. पत्रकार संरक्षणासाठी स्वतंत्र कायदा, आरोग्य आणि अपघात विमा योजना, कायदेशीर मदतीसाठी केंद्र, ग्रामीण भागातील पत्रकारांसाठी शिष्यवृत्ती, प्रत्येक राज्यात मीडिया भवन उभारणे, फेक न्यूजविरोधी यंत्रणा, डिजिटल पत्रकारांसाठी संरक्षण धोरण, ज्येष्ठ पत्रकारांसाठी निवृत्तिवेतन योजना, सरकारी प्रवासात सवलती आणि २० मे हा ‘राष्ट्रीय पत्रकार सुरक्षा दिन’ म्हणून घोषित करणे यासारख्या अनेक मागण्यांवर अधिवेशनात ठोस निर्णय घेण्यात आले. या अधिवेशनात महिला पत्रकार सशक्तीकरण सत्र, डिजिटल माध्यमातील नव्या संधी व आव्हाने, गावखेड्यांतील पत्रकारितेची भूमिका व अडचणी, पत्रकारांसाठी कायदेविषयक साक्षरता मोहीम, आणि ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या प्रवासाचे दस्तावेज स्वरूपातील राष्ट्रीय स्मरणिका प्रकाशन अशा अनेक विशेष सत्रांचा समावेश होता.
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची महाराष्ट्र कोअर टीम देखील या अधिवेशनात जाहीर करण्यात आली. महाराष्ट्र कोअर टीममध्ये अजितदादा कुंकुलोळ, कुमार कडलक, गोरक्षनाथ मदने, रश्मी मारवाडी, किरण ठाकरे, कल्पेश महाले, किशोर कारंजेकर, अमोल मतकर, नरेंद्र देशमुख, पल्लवी शेटे आणि संगम कोटलवार यांचा समावेश आहे. या नवघोषित कोअर टीमचे स्वागत महाराष्ट्राचे अध्यक्ष अनिल म्हस्के यांनी दिल्लीत केले.
या अधिवेशनात खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना संसद भूषण पुरस्कार, आमदार समीर कुणावार यांना विकास पुरुष पुरस्कार, आदित्य अनघा मल्टिस्टेट क्रेडिट को ऑप सोसायटीच्या अनघा समीर सराफ यांना उद्योग रत्न पुरस्कार, व्यंकटेश जोशी यांना समाज रत्न पुरस्कार आणि डॉ. पंजाब खानसोळे यांना विकास रत्न पारधी जयवंत पारधी गुरुजी यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. उर्जा पाटील यांनी पदाधिकारी यांना प्रशिक्षण दिले. तर व्हाईस ऑफ मीडियाचे आंतरराष्ट्रीय प्रमुख गगन महोत्रा यांनी व्यावसायिक पत्रकारितावर भाष्य केले. राष्ट्रीय महासचिव दिव्या भोसले, राष्ट्रीय कोषाध्यक्ष चेतन बंडेवार यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. हा चार दिवसीय कार्यक्रम ‘व्हॉईस ऑफ मीडिया’साठी नवचैतन्याचा श्वास ठरला असून, पत्रकारांच्या हितासाठी देशव्यापी उपक्रमांना गती मिळणार आहे.