आमदार दहीहंडी सोहळ्याने एरंडोल विधानसभा मतदारसंघात रचला इतिहास…!
आमदार दहीहंडी सोहळ्याने एरंडोल विधानसभा मतदारसंघात रचला इतिहास...!

इमरान शेख उपसंपादक
अभूतपूर्व! अविश्वसनीय! न भूतो न भविष्यति!
७ थरांची सलामी अन् रावेरच्या गोविंदा पथकाने पटकावला मानाचा प्रथम क्रमांक; NES मैदानावर उसळला जनसागर
पारोळा : आमदार मा.ॲड. अमोलदादा पाटील यांच्या संकल्पनेतून पारोळा शहरातील NES हायस्कूलच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेला ‘आमदार दहीहंडी सोहळा’ अभूतपूर्व उत्साह, जल्लोष आणि थरारात पार पडला. एरंडोल विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदाच एवढ्या भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याला नागरिकांनी अक्षरशः तुफान प्रतिसाद दिला. मैदानात उभे राहण्यासाठीदेखील जागा अपुरी पडावी, एवढा जनसागर या सोहळ्यासाठी लोटला होता. त्यामुळे हा सोहळा संपूर्ण मतदारसंघाच्या इतिहासातील ‘न भूतो न भविष्यति’ असा ठरला.
मुंबई आणि पुणे यांसारख्या महानगरांमध्ये पाहायला मिळणाऱ्या भव्य दहीहंडी सोहळ्याचा थरार आपल्या गावातील गोरगरीब, कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिकांनाही अनुभवता यावा, या उद्देशाने आमदार मा.ॲड. अमोलदादा पाटील यांच्या संकल्पनेतून या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
गोविंदा पथकांच्या थरारक सादरीकरणाने संपूर्ण मैदान दणाणून गेले. विशेष म्हणजे गोविंदा पथकांनी तब्बल ७ थरांचा मानवी मनोरा उभारत दहीहंडीला सलामी दिली. सात थरांची ही थरारक सलामी पाहताना उपस्थित हजारो नागरिकांनी टाळ्यांचा कडकडाट आणि जल्लोष करत गोविंदांचा उत्साह वाढविला.
या अटीतटीच्या आणि थरारक स्पर्धेत महात्मा फुले मित्र मंडळ, रावेर या संघाने आपल्या दमदार कामगिरीचे दर्शन घडवत तब्बल ७ थर लावत मानाचा बहुमान पटकावला आणि प्रथम क्रमांकाचे ₹१ लाख ५१ हजारांचे पारितोषिक आपल्या नावे केले. रावेरच्या गोविंदा पथकाने सात थरांचा मनोरा उभारत मिळविलेला हा विजय सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले.
द्वितीय क्रमांकाचे ₹३१ हजारांचे पारितोषिक श्रीकृष्ण बहुउद्देशीय संस्था, जळगाव यांनी, तर तृतीय क्रमांकाचे ₹११ हजारांचे पारितोषिक गोपाळपुरा मित्र मंडळ, जळगाव यांनी पटकावले. तसेच सात थरांवर सलामी देणाऱ्या गोविंदा पथकांसाठी विशेष गौरव करण्यात आला.
भव्य विद्युत रोषणाई, आकर्षक साऊंड शो, गोविंदा पथकांचा थरार आणि हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे NES हायस्कूलचे मैदान जल्लोषाने दुमदुमून गेले. पारोळा शहरासह एरंडोल, भडगाव आणि संपूर्ण विधानसभा मतदारसंघातील विविध गावांमधून नागरिक मोठ्या संख्येने या सोहळ्यासाठी दाखल झाले होते.
यावेळी उपस्थित जनसागराला संबोधित करताना आमदार मा.ॲड. अमोलदादा पाटील यांनी तमाम नागरिकांना दंडवत करत त्यांच्या अलोट प्रेमाबद्दल आणि उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केले. दहीहंडी हा केवळ मनोरंजनाचा कार्यक्रम न राहता त्यातून युवकांना सकारात्मक दिशा देण्याचा आणि समाजाला विधायक संदेश देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
युवकांनी व्यसनांपासून दूर राहावे, आपली ऊर्जा सकारात्मक आणि विधायक कार्यासाठी वापरावी, क्रीडा व संस्कृतीशी जोडले जावे, असा संदेश अमोलदादांनी आपल्या भाषणातून दिला. त्याचबरोबर एरंडोल विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाची दिशा आणि सुरू असलेल्या विकासकामांवरही त्यांनी भाष्य केले.
या भव्य सोहळ्यास नगरपरिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, नगरसेवक-नगरसेविका, विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी व सदस्य, शिवसेना-युवासेनेचे आजी-माजी पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक, पत्रकार बांधव, विविध गावांतून आलेले नागरिक, गोविंदा पथके तसेच हजारो माता-भगिनी आणि तमाम शहरवासीयांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
७ थरांचा थरार… रावेरच्या संघाचा मानाचा बहुमान… हजारो नागरिकांचा अभूतपूर्व जल्लोष… आणि अमोलदादांच्या संकल्पनेला लाभलेली जनतेची तुफान साथ!
यामुळे ‘आमदार दहीहंडी सोहळा’ हा केवळ एक उत्सव न राहता एरंडोल विधानसभा मतदारसंघाच्या इतिहासातील एक अविस्मरणीय आणि ऐतिहासिक जनसोहळा ठरला.
आमदार दहीहंडी…
७ थरांचा थरार अन् जनसागराच्या साक्षीने रचला विजयाचा इतिहास!



