Breaking
ब्रेकिंग

पारोळ्यात स्पर्धा परीक्षार्थींसाठी ‘उत्कर्ष Guidance & Study Center’चा शुभारंभ…!

पारोळ्यात स्पर्धा परीक्षार्थींसाठी ‘उत्कर्ष Guidance & Study Center’चा शुभारंभ...!

1 1 1 1 8 1

इमरान शेख उपसंपादक

पारोळ्यातून अनेक अधिकारी घडले पाहिजेत” — आमदार ॲड. अमोलदादा पाटील

पारोळा : शहरातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवक-युवतींना गुणवत्तापूर्ण अभ्यासासाठी शांत, शिस्तबद्ध आणि सुविधायुक्त वातावरण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने उत्कर्ष फाउंडेशन संचलित ‘उत्कर्ष Guidance & Study Center’ या अभ्यासिका केंद्राचा शुभारंभ आमदार ॲड. अमोलदादा पाटील यांच्या हस्ते उत्साहात झाला. पारोळा शहरात स्पर्धा परीक्षार्थींसाठी अशा स्वरूपाचे अभ्यासिका केंद्र प्रथमच सुरू करण्यात आले आहे.

आमदार ॲड. अमोलदादा पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमाला प्रत्यक्ष स्वरूप देण्यासाठी त्यांच्या पत्नी तथा उत्कर्ष महिला परिवाराच्या अध्यक्षा मा. मृणालताई पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.

यावेळी बोलताना आमदार अमोलदादा पाटील म्हणाले की, एरंडोल विधानसभा मतदारसंघातील युवक-युवतींमध्ये गुणवत्ता आणि क्षमता मोठ्या प्रमाणात आहे. मात्र स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी आवश्यक असलेले शांत वातावरण, संदर्भ साहित्य आणि आधुनिक सुविधा उपलब्ध नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना मोठ्या शहरांकडे जावे लागते. ही परिस्थिती लक्षात घेऊन पारोळ्यातच विद्यार्थ्यांना सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या अभ्यासिकेची उभारणी करण्यात आली आहे.

 

पारोळ्यातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मोठ्या शहरांकडे जाण्याची गरज भासू नये. त्यांना आपल्या शहरातच चांगल्या सुविधा, शांत वातावरण आणि आवश्यक अभ्यास साहित्य उपलब्ध झाले पाहिजे, ही माझी भूमिका आहे,” असे अमोलदादा पाटील यांनी सांगितले.

आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून प्रशासकीय सेवा, पोलीस विभाग, बँकिंग, रेल्वे, महसूल, शिक्षण, आरोग्य, वन विभाग यांसह विविध क्षेत्रांत आपले स्थान निर्माण केले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.

आपल्या मतदारसंघातील एखादा विद्यार्थी अधिकारी झाला, मोठ्या पदावर पोहोचला आणि त्याने आपल्या कुटुंबासह पारोळ्याचे नाव उज्ज्वल केले, तर त्यापेक्षा मोठे समाधान दुसरे कोणतेही नाही. या अभ्यासिकेतून भविष्यात अनेक अधिकारी घडावेत, हीच अपेक्षा आहे,” असे भावनिक उद्गार त्यांनी काढले.

स्पर्धा परीक्षेची तयारी ही सातत्य, शिस्त आणि संयमाची प्रक्रिया असल्याचे सांगत अमोलदादांनी विद्यार्थ्यांना मोबाईल व इतर अनावश्यक गोष्टींपासून दूर राहून ध्येयावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. “सुविधा उपलब्ध करून देणे ही आमची जबाबदारी आहे; त्या सुविधांचा योग्य वापर करून यश मिळवणे ही विद्यार्थ्यांची जबाबदारी आहे,” असेही त्यांनी सांगितले.

यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील, उपनगराध्यक्ष ॲड. रोहनदादा मोरे, पारोळा तहसिलदार डॉ. उल्हास देवरे, एरंडोल तहसिलदार गोपाळ पाटील, पारोळा पोलीस निरीक्षक दिपक पवार, एरंडोल पोलीस निरीक्षक सुनिल पवार आणि पारोळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भूषण कदम यांनी उपस्थित विद्यार्थी व युवक-युवतींना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसंदर्भात मार्गदर्शन केले. विविध क्षेत्रातील प्रशासकीय व पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या अनुभवातून विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण अभ्यास, शिस्त, वेळेचे नियोजन आणि ध्येय निश्चितीचे महत्त्व पटवून दिले.

दरम्यान, या अभ्यासिका केंद्रामध्ये MPSC, UPSC, SSC, Banking, Railway, TET, CTET, पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य विभाग, वनरक्षक, महसूल विभाग तसेच गट-ब व गट-क आदी विविध स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक पुस्तके व संदर्भ साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे.

अभ्यासिकेत प्रशस्त व हवेशीर अभ्यास हॉल, संदर्भ ग्रंथालय, सराव प्रश्नसंच, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, चालू घडामोडी व सामान्य ज्ञानाचे साहित्य, डिजिटल अभ्यास सुविधा, हाय-स्पीड Wi-Fi, CCTV सुरक्षा व्यवस्था, नैसर्गिक प्रकाश, मोबाईल चार्जिंग पॉईंट्स, स्वच्छ पिण्याचे पाणी आणि प्राथमिक उपचाराची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

ही अभ्यासिका केवळ अभ्यासासाठीची जागा न राहता युवकांच्या स्वप्नांना दिशा देणारे केंद्र बनावे, तसेच भविष्यात मतदारसंघातील इतर शहरांमध्ये आणि ग्रामीण भागातही अशा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला.

उद्घाटनप्रसंगी उत्कर्ष महिला परिवाराच्या अध्यक्षा मा. मृणालताई पाटील, लोकनियुक्त नगराध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील, उपनगराध्यक्ष ॲड. रोहनदादा मोरे, नगरसेवक राजेंद्रबापू पाटील, पारोळा तहसिलदार डॉ. उल्हास देवरे, एरंडोल तहसिलदार गोपाळ पाटील, पारोळा पोलीस निरीक्षक दिपक पवार, एरंडोल पोलीस निरीक्षक सुनिल पवार, पारोळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भूषण कदम, शिवसेना तालुकाप्रमुख मधुकरआबा पाटील, शिवसेना शहरप्रमुख, गटनेते तथा नगरसेवक अमृतभाऊ चौधरी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा नगरसेवक मनिषभाऊ पाटील, शिवसेना प्रतोद तथा नगरसेवक नितीन सोनार, शिवसेना उपगटनेते तथा नगरसेवक पंकज मराठे, भाजपा चिटणीस धिरज महाजन, भाजपा प्रतोद तथा नगरसेवक अमोल शिरोळे, नगरसेवक मनोजभाऊ जगदाळे, राजुबापू पाटील, विवेक पाटील, राजूभाऊ कासार, प्रमोदशेठ कासार, छोटू पाटील, बापू मिस्तरी, नजीरखान बेलदार, दगडू पवार सर, दिपक अनुष्ठान, इमरान शेख यांच्यासह विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, सदस्य, शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी, पालक, पत्रकार आणि नागरिक उपस्थित होते.

पारोळ्यातील युवक-युवतींच्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीला नवी दिशा देणारे हे केंद्र भविष्यात अनेक यशस्वी अधिकारी घडविण्याचे महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला..

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 1 1 1 8 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे