अतिवृष्टीग्रस्त भागाची मंत्र्यांकडून पाहणी; आमदार ॲड. अमोलदादा पाटील यांनी मांडल्या शेतकरी व नागरिकांच्या हिताच्या विविध मागण्या…!
अतिवृष्टीग्रस्त भागाची मंत्र्यांकडून पाहणी; आमदार ॲड. अमोलदादा पाटील यांनी मांडल्या शेतकरी व नागरिकांच्या हिताच्या विविध मागण्या...!

उपसंपादक इमरान शेख
दि. ३० जुलै, २०२६ रोजी झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे एरंडोल विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शेती, घरे, रस्ते, पूल, पशुधन तसेच इतर सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर आज पारोळा तालुक्यातील देवगांव, तामसवाडी व मुंदाणे प्र.उ. या अतिवृष्टीग्रस्त गावांना भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करण्यात आली.
यावेळी राज्याचे जलसंपदामंत्री मा. ना. गिरीशजी महाजन, राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. गुलाबरावजी पाटील, आमदार मा. ॲड. अमोलदादा पाटील, जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रोहनजी घुगे तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांतजी धिवरे यांनी शेतकऱ्यांशी व नागरिकांशी संवाद साधत नुकसानग्रस्त भागाची सविस्तर पाहणी केली.
या प्रसंगी आमदार मा. ॲड. अमोलदादा पाटील यांनी मतदारसंघातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा सविस्तर आढावा मंत्र्यांसमोर मांडला. शेतकऱ्यांच्या झालेल्या मोठ्या नुकसानीची दखल घेत सरसकट पंचनामे करण्याची मागणी त्यांनी ठामपणे केली. तसेच “गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार” योजनेच्या शासन निर्णयामध्ये तातडीने सुधारणा करून अतिवृष्टी, ढगफुटी व महापुरामुळे शेतातील सुपीक माती वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात गाळ अथवा माती भराव करण्यासाठी प्रति एकर ₹५०,००० विशेष अनुदान मंजूर करण्यात यावे, अशी महत्त्वपूर्ण मागणी केली.
यासोबतच एरंडोल विधानसभा मतदारसंघासाठी “सरसकट विशेष मदत पॅकेज” जाहीर करून शेती, घरे, पायाभूत सुविधा, रस्ते, पूल तसेच इतर नुकसानग्रस्त घटकांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणीही आमदार अमोलदादा पाटील यांनी केली. पूरस्थितीमुळे नागरिकांना भेडसावत असलेल्या विविध अडचणींकडे लक्ष वेधत त्वरित दिलासा देण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याची विनंतीही त्यांनी मंत्र्यांकडे केली.
आमदार अमोलदादा पाटील यांनी मांडलेल्या सर्व मागण्यांची दखल घेत मा. मंत्री गिरीशजी महाजन व मा. पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना सरसकट पंचनामे करण्याबाबत, तातडीची मदत पोहोचविण्याबाबत तसेच स्थानिक पातळीवर आवश्यक त्या सर्व उपाययोजना युद्धपातळीवर राबविण्याच्या सूचना दिल्या. कोणताही नुकसानग्रस्त शेतकरी किंवा नागरिक मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.
यावेळी संबंधित विभागांचे अधिकारी, स्थानिक प्रशासनाचे कर्मचारी, पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. नुकसानग्रस्त नागरिकांना तातडीने न्याय मिळावा आणि शासनाची मदत जलदगतीने पोहोचावी, यासाठी शासनस्तरावर सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही यावेळी मान्यवरांनी दिली.



