कासोद्यात दूषित व दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा ; जनतेच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर…!
कासोद्यात दूषित व दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा ; जनतेच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर...!

कासोदा प्रतिनिधी :-
सध्या उन्हाळ्याचा पारा चाळीशी पार गेला असताना, एकीकडे नागरिक उष्णतेमुळे हैराण झाले आहेत.अशा परिस्थितीत कासोदा ग्रामपंचायतीकडून वॉर्ड क्रमांक १ शेलार गल्ली गढी भागात आज दि.२६ एप्रिल रविवार रोजी नागरिकांना चक्क दूषित आणि दुर्गंधीयुक्त असलेल्या पाण्याचा पुरवठा होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. निसर्गाच्या तिन्ही ऋतूत येथे १५ – २० दिवसात पाणी पुरवठा केला जात असतो. तरी देखील पाण्याची गुणवत्ता घाणेरड्या स्वरूपात दिसत आहे.प्रशासनाच्या या बेजबाबदारपणामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
नेमका प्रकार काय?
गेल्या काही दिवसांपासून गावातील विविध भागांत नळाद्वारे येणारे पाणी अत्यंत गढूळ आणि दुर्गंधीयुक्त आहे.अनेक ठिकाणी पाण्यात शेवाळ आणि कचरा येत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. हे पाणी पिण्यायोग्य तर नाहीच , पण साध्या वापरासाठीही भीतीदायक ठरत आहे.१५-२० दिवसात पाणी पुरवठा होत असतो तो ही अशा तो देखील अशा पद्धतीने केला जात आहे. उन्हाळ्यात पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने उपलब्ध साठ्याचे शुद्धीकरण न करताच पुरवठा केला जात असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
आरोग्याचा धोका वाढला
दूषित पाण्यामुळे गावात जलजन्य आजारांचा धोका बळावला आहे. लहान मुले आणि वृद्धांना उलट्या, जुलाब आणि पोटाच्या विकारांनी ग्रासले असून खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे.प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे नागरिकांच्या आरोग्याशी उघडपणे खेळ खेळला जात असून , या दूषित पाण्यामुळे गावात आजार बळावण्याची भीती व्यक्त केली जात आहे. “आम्ही नियमित पाणीपट्टी भरतो , मग आम्हाला शुद्ध पाणी का मिळत नाही?” असा संतप्त सवाल महिला वर्गाकडून विचारला जात आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष
या गंभीर विषयावर ग्रामपंचायत प्रशासनाकडे वारंवार तोंडी तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. पाणी शुद्धीकरणासाठी वापरली जाणारी यंत्रणा कुचकामी ठरत आहे की पावडरचा वापर केला जात नाही , याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
तालुक्याचे आमदार अमोल दादा पाटील यांनी कासोदेकरांना शुद्ध व लवकर पाणी पुरवठा कसा केला जाईल याकडे जातीने लक्ष दिले पाहिजे अशी येथील ग्रामस्थांची मागणी आहे. तसेच वरिष्ठांनी नागरिकांच्या जीवाशी खेडणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे.



