२० हजार रुपयांची लाच रंगेहात स्वीकारताना वायरमनला जळगाव एसीबी कडून अटक
उपसंपादक – कल्पेश महाले
जळगाव – शहरात राहणाऱ्या ४८ वर्षीय पुरुष तक्रारदार यांचे घराचे बांधकाम साईटवर पूर्ण झाल्यानंतर सदर ठिकाणी नवीन पोल टाकण्यात आले होते. या पोलवरुन वीज कनेक्शन सुरू करण्यासाठी तक्रारदार हे महावितरण कार्यालय शिरसोली जळगाव येथे वेळोवेळी गेले होते. यावेळी वरिष्ठ तंत्रज्ञ विक्रांत अनिल पाटील (देसले) वय ३८ वर्षे, शिरसोली युनिट माऊली नगर, जळगाव यांनी सदरचे काम करून देण्याच्या मोबदल्यात ३० हजार रुपयाची लाचेची मागणी केली होती. त्यापैकी १० हजार रुपये अगोदर घेतले होते. तरीसुद्धा वीज कनेक्शन चालू करून देत नव्हते. ते वीज कनेक्शन चालू करून देण्यासाठी उर्वरित ठरलेले २० हजार रुपये लाचेची मागणी करित होते.
त्याबाबत तक्रारदार यांनी जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग येथे दि.१८ रोजी तक्रार दिली होती. सदरील तक्रारीप्रमाणे पंचम समक्ष लाचेची पडताळणी करण्यात आली. त्यानुसार आज दि. ८ नोव्हेंबर रोजी वरिष्ठ तंत्रज्ञ अनिल पाटील (देसले) यांना २० हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात एसीबी पथकाने पकडले असून त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरील कारवाई ही जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगाव पोलीस उपाधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, पो.ना. किशोर महाजन, पो.कॉ. राकेश दुसाने यांच्या पथकाने केली.