Breaking
जळगावधुळेनंदुरबारनाशिकब्रेकिंगमहाराष्ट्र

आगीच्या अफवेनंतर पुष्पक एक्सप्रेसमधून प्रवाशांनी मारल्या उड्या; कर्नाटका एक्स्प्रेसनं 11 जणांना चिरडलं

0 7 5 0 2 3

उपसंपादक – कल्पेश महाले 

पाचोरा – तालुक्यातील परधाडे रेल्वे स्टेशन जवळ धावत्या पुष्पक एक्सप्रेस मध्ये आग लागल्याची अफवा उडाली. यात रेल्वे मधील प्रवासी भयभीत झाले आणि गाडी थांबविण्यासाठी कोणीतरी चैन ओढून गाडी थांबविली असता प्रवाशी डब्यातून रेल्वे रुळावर उतरले आणि क्षणात पुढील अनर्थ घडला.

या भीषण झालेल्या अपघाताबद्दल विशेष प्रतिक्रिया

घटना अतिशय वेदनादायी – मुख्यमंत्री

जळगाव जिल्ह्यातील पाचोरानजीक एका अत्यंत दुर्दैवी घटनेत काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

माझे सहकारी मंत्री गिरीश महाजन तसेच पोलीस अधीक्षक हे घटनास्थळी पोहोचले असून, जिल्हाधिकारी काही वेळात तेथे पोहोचत आहेत. संपूर्ण जिल्हा प्रशासन रेल्वे प्रशासनाशी समन्वयाने काम करीत असून, जखमींच्या उपचारासाठी तातडीने व्यवस्था करण्यात येत आहेत. 8 रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्या आहेत. सामान्य रुग्णालय तसेच नजीकच्या इतर खाजगी रुग्णालयांना जखमींवर उपचारासाठी सज्ज ठेवण्यात आले आहे. ग्लासकटर, फ्लडलाईट्स इत्यादी आपातकालिन यंत्रणा सुद्धा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. संपूर्ण स्थितीवर आम्ही लक्ष ठेऊन असून, आवश्यक ती सर्व मदत तातडीने पुरविण्यात येत आहे. मी जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहे.

राज्य सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखाची मदत – CM फडणवीस

रेल्वे अपघातातील मृतांच्या कुटुंबांना राज्य सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. जखमींचा संपूर्ण उपचार मोफत करण्यात येईल. जखमींच्या नातेवाईकांना रुग्णालयात सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मंत्री गिरीष महाजन घटनास्थळी दाखल झाले असून सर्व परिस्थिती सांभाळत आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मध्य रेल्वेच्या PRO ने सांगितला घटनाक्रम

मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी सांगितले की, पुष्पक एक्सप्रेसमधील प्रवाशांनी रेल्वेची चेन ओढली होती. त्यानंतर काही प्रवाशी रेल्वेतून उतरून दुसऱ्या ट्रॅकवर उभे राहिले. त्या प्रवाशांना दुसऱ्या दिशेने येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने उडवले. ही रेल्वे बंगळुरूहून दिल्लीकडे जात होती. या घटनेत 7 ते 8 प्रवाशी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी स्थानिक रुग्णालय व प्रशासनाची मदत घेतली जात आहे. याशिवाय भुसावळ रेल्वे स्थानकावरील आपत्कालीन रेल्वे गाडीही घटनास्थळाच्या दिशेने रवाना झाली आहे. या प्रकरणी जखमी प्रवाशांपर्यंत लवकरात लवकर मदत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

मदतकार्य रात्रीही सुरु राहणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

जळगाव जिल्ह्यात पाचोरा येथे परधाडे रेल्वे स्थानकानजिक रेल्वे अपघातात प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. मी मृत्यू पावलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून या अपघाताची माहिती घेतली. यावेळी जखमी प्रवाशांना तातडीची मदत व मोफत वैद्यकीय उपचारांची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. मंत्री गिरीश महाजन स्वत: घटनास्थळी पोहोचले असून जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षकांसह जिल्हा यंत्रणा युद्धपातळीवर बचाव आणि मदतकार्य राबवत आहे. जिल्हा प्रशासन आणि रेल्वे यंत्रणा समन्वयाने बचाव व मदतकार्य करीत आहेत. मदतकार्य रात्रीही सुरु राहणार आहे. त्यासाठी ग्लासकटर, फ्लडलाईट्सह आवश्यक यंत्रणा अपघातस्थळी पोहोचली आहे, अजित पवार म्हणाले.

सरकारकडून सर्वतोपरी मदत केली जात आहे – उपमुख्यमंत्री शिंदे

जळगावात घडलेली घटना अतिशय दुर्दैवी, दुःख आणि वेदनादायी आहे. आग लागली, म्हणून या भीतीने लोकांनी उड्या मारल्या आणि समोरून एक गाडी आली. त्यामुळे हा अपघात झाला. घटनास्थळी संबंधित यंत्रणा कामी लागली आहे. जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांशी मी चर्चा केली आहे. सरकारकडून सर्वतोपरी मदत केली जात असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

रेल्वे रुळ ओलांडताना झाला अपघात – गुलाबराव पाटील

राज्याचे पाणी पुरवठा मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी रेल्वे रुळ ओलांडताना ही दुर्घटना घडल्याचे सांगितले आहे. हा रेल्वे अपघात रेल्वे रुळ ओलांडताना झाल्याचा दावा केला जात आहे. या घटनेची माहिती अजून यायची आहे. प्रशासन कोणत्याही परिस्थितीत प्रवाशांना मदत करण्यासाठी सज्ज आहे, असे ते म्हणालेत.

आगीच्या अफवेनंतर लोकांनी ट्रेनमधून उड्या मारल्या –  जळगांव खासदार स्मिता वाघ

जळगावच्या खासदार स्मिता वाघ म्हणाल्या, डीआरएम आणि जिल्हाधिकाऱ्यांशी माझी चर्चा झाली आहे. डॉक्टरांची एक टीम पाठवण्यात आली आहे. मी ही तिथे पोहोचते आहे. आगीच्या अफवेनंतर लोकांनी पुष्पक एक्सप्रेस ट्रेनमधून उड्या मारल्या. त्याचवेळी कर्नाटक एक्सप्रेस दुसऱ्या ट्रॅकवर आली, असे सुरुवातीला म्हटले जात होते.

मृतांचा आकडा 12 वर पोहोचला

अपघातातील मृतांचा आकडा 11 वरून 12 झाला आहे. 12 मृतदेह जवळच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहेत, तर 7 ते 8 जण जखमी आहेत अशी माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी पीटीआयशी बोलताना दिली.

7 मृतांची ओळख पटली

मृतांमध्ये 9 पुरुष आणि 3 महिलांचा समावेश आहे. यापैकी 7 जणांची ओळख पटली. सर्वच मृतदेह जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले गेले आहेत.

मृतांमध्ये 3 जण नेपाळचे

1. नंदराम विश्वकर्मा ( वय सुमारे 11 वर्ष, नेपाळ)

2. लच्छी राम पासी (वय सुमारे 23 वर्ष, नेपाळ)

3. कमला नवीन भंडारी (वय 43 वर्ष, नेपाळ)

4. जवकला बुट्टे जयगादी (वय 50 वर्ष)

5. नसीरुद्दीन बदरुद्दीन सिद्दीकी ( वय सुमारे 20 वर्ष, गोंडा)

6. इम्तियाज अली (वय 35 वर्ष, गुलरिहा उत्तर

प्रदेश)

7. बाबू खान (वय सुमारे 30 वर्ष)

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 5 0 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे