
उपसंपादक – कल्पेश महाले
चाळीसगांव – तालुक्यातील भऊर, जामदा येथे अवैध वाळू वाहतुक करणाऱ्या तस्कारांनी चांगलाच कहर केला आहे. रात्रीच्या सुमारास वाळू वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टरमुळे या पाणंद रस्त्यांना लागून गेलेल्या काही शेतकऱ्यांच्या पाईपलाईन लिकेज झाल्याचा प्रकार समोर आला. शेतकऱ्यांना शेतात जाणे अवघड झाले होते. त्यामुळे काही संतप्त शेतकऱ्यांनी दोन दिवसापूर्वी रात्री या पाणंद रस्त्यावरच धाव घेत ट्रॅक्टर अडवण्याचा प्रयत्न केला असता शेतकऱ्यांना पाहताच ट्रॅक्टर मधील वाळू रस्त्याच्या कडेला टाकून वाळू चोरांनी पळ काढला होता. त्यानंतर शुक्रवारी रात्री तस्करांनी गिरणा नदीकडे जाणाऱ्या मार्गावर रस्ता तयार करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे एका शेतकऱ्याने थेट जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना तेवढ्या रात्री फोन करून झालेला प्रसंग कथन केला. जिल्हाधिकारी यांनी एवढ्या रात्री शेतकऱ्याच्या आलेल्या फोनची तातडीने दखल घेत महसूल प्रशासनाला तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर चाळीसगांव भाग प्रांताधिकारी प्रमोद हिले, तहसीलदार प्रशांत पाटील, नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास बहाळ भागाचे मंडळाधिकारी विष्णुकुमार राठोड, जामदा तलाठी प्रशांत कनकुरे, खेडगाव तलाठी निलेश पवार यांनी घटनास्थळी जेसीबीने खड्डे खोदून कारवाई केली.
स्थानिक शेतकऱ्यांनी या कारवाईचे केले स्वागत
यावेळी भऊर पोलीस पाटील शेखर जाधव, भऊर सरपंच पती प्रविण पाटील, कोतवाल राजू कोळी, रायबा जाधव, गोरख जाधव यांच्यासह शेतकरी लहू पाटील, भावडू दुधवाले, पंकज पाटील हे उपस्थित होते. भऊर, जामदा येथे गिरणा नदीच्या काठी नदीपात्रातून वाळू उत्खनन करण्यासाठी वाळू तस्कर ज्या मार्गाने ये-जा करतात त्या नदीकाठी मार्गावर जेसीबीने मोठ-मोठे खड्डे खणून हा रस्ता बंद केला. जेणेकरून या मार्गावरून वाळू तस्करांना ट्रॅक्टर मधून वाळू वाहतुक करता येणार नाही. या कारवाईचे स्थानिक शेतकऱ्यांनी स्वागत केले असून जिल्हाधिकाऱ्यांना धन्यवाद दिले आहेत.
दरम्यान भऊर, जामदा येथे गिरणा नदीकाठच्या परिसरात शेतकरी आपल्या शेतात जाण्यासाठी ज्या पाणंद रस्त्यांचा वापर करतात त्या मार्गावर सततच्या अवैध वाळू वाहतुकीमुळे या भागातील पाणंद रस्त्यांची चांगलीच वाट लागली आहे. पाणंद रस्ताच वाळू चोरट्यांनी खराब करून टाकल्याने शेतकऱ्यांना शेतात जाण्यास अडचणी येत असून या प्रकरणी तक्रार करूनही काहीच कारवाई होत नसल्याने दोन दिवसापूर्वी शेतकऱ्यांनी वाळू वाहतुक करणारे ट्रॅक्टर रोखले होते. त्यावेळी ट्रॅक्टरचालकाने रस्त्यावरच वाळू टाकून पळ काढला होता. त्यानंतर शुक्रवारी रात्री वाळू तस्करांनी या गिरणा नदीकडे जाणाऱ्या मार्गावर रस्ता तयार करण्याचे काम सुरू केले. याची माहीती शेतकऱ्यांना मिळताच तेवढ्या रात्री शेतक-यांनी थेट जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना फोन करून झालेला प्रकार कथन केला. जिल्हाधिकाऱ्यांनी तत्परतेने शेतकन्यांच्या तक्रारीची दखल घेत महसूल प्रशासनास कारवाईचे आदेश दिल्यानंतर आज सकाळी वाळू तस्करांनी तयार केलेल्या रस्त्यावर जेसीबीने मोठमोठे खड्डे खणून वाळू तस्करांना चांगलाच दणका दिला. या भागात सध्या शेतकऱ्यांच्या शेतातील उस तोडणी सुरू असून अवैध वाळू वाहतुकीमुळे शेतक-यांच्या पाईपलाईन लिकेज झाल्याने रस्त्यावर चिखल झाल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले होते.
दरम्यान यापूर्वी या भागात वाळू चोरांनी वाळू वाहतुकीसाठी रस्ता तयार केल्याचा प्रकार घडला होता तेव्हाही महसूल विभागाकडे तक्रार केल्यानंतर अशाच प्रकारे रस्त्यांवर खड्डे खणून रस्ता बंद करण्यात आला होता. त्यामुळे अवैध वाळू वाहतुकीला लगाम बसला होता. आता पुन्हा महसूल प्रशासनाने जेसीबीने रस्त्यावर खड्डे खोदल्याने अवैध वाळू वाहतुक होणार नाही अशी शक्यता असली तरी काही दिवसानंतर वाळूचोर हे खड्डे बुजवून पुन्हा अवैध वाळू वाहतुक करू शकतात त्यामुळे अवैध वाळू वाहतूकीवर महसूल प्रशासनाने सज्ज राहून नेहमी तात्काळ कारवाई करावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.