Breaking
जळगावधुळेनंदुरबारनाशिकब्रेकिंगमहाराष्ट्र

नौदल स्पीड बोटीची प्रवासी नावेला धडक : 13 जण ठार, मृतांत 10 पर्यटक, 3 नौदल कर्मचारी

0 5 3 3 3 2

उपसंपादक – कल्पेश महाले

मुंबई – मुंबईतील एलिफंटा लेणी पाहण्यास निघालेल्या पर्यटकांच्या नीलकमल प्रवासी बोटीला नौदलाच्या स्पीड बोटीने धडक दिली. यात दोन्ही बोटी अरबी समुद्रात उलटून १३ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये १० पर्यटक व ३ नौदल जवानांचा समावेश आहे, तर अत्यवस्थ असलेल्या दोन जवानांवर उपचार सुरू आहेत. ही दुर्घटना बुधवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास गेटवे ऑफ इंडियापासून काही अंतरावर घडली.

बचाव पथकाच्या तत्परतेमुळे १०१ प्रवाशांना वाचवण्यात यश आले. नौदलाचे ४ हेलिकॉप्टर, १४ बोटी, कोस्ट गार्ड व मुंबई पोलिसांच्या ३ बोटी तसेच मच्छीमारांच्या मदतीने बचाव मोहीम राबवण्यात आली. त्यामुळे अनेकांचे जीव वाचवण्यात यश आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १३ लोकांच्या मृत्यूची पुष्टी केली असून रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होते. मृतांच्या वारसांना राज्य सरकारतर्फे ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली.

 चूक नौदलाची : बोटमालक

नीलकमल बोटीचे मालक रवींद्र पडते म्हणाले, ‘रोजप्रमाणे २ ते २.३० च्या सुमारास नेहमीप्रमाणे गेटवे ऑफ इंडियाहून प्रवाशांना घेऊन आमची बोट एलिफंटाकडे गेली होती. सर्व प्रवाशांनी लाइफ जॅकेट घातले होते. मात्र नौदलाची स्पीड बोट वेगाने आली होती. स्पीड बोटीने नागमोडी वळण घेतल्यानंतर ती वेगाने प्रवासी बोटीवर आदळली. त्यामुळे प्रवासी बोट उलटून अपघात घडला. याचा व्हिडिओही प्रवाशाने काढल्याचे समोर आले आहे.

समुद्री पर्यटनाचा आनंद घेत असताना काळ बनून अंगावर आली स्पीड बोट

समुद्राच्या मधोमध आमची बोट आली होती. थंडगार हवेचा आनंद आम्ही सगळे जण लुटत होतो. अचानक एक स्पीड बोट ‘काळ’ बनून जोरात येऊन आमच्या बोटीला धडकली. अवघ्या काही क्षणांत सगळेच हादरून गेले. अंगाचा थरकाप उडवणारा हा प्रसंग होता. या धडकेत बोटीतच एकाचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या प्रवाशाचा पाय कापला गेला. आम्हाला काहीच कळले नाही. स्पीड बोटीच्या धडकेनंतर आमच्या बोटीत पाणी शिरायला लागले. त्यामुळे सर्वजण घाबरले. बोटीत काही लहान मुलेही होती, ती ओरडायला लागली. त्यांचे पालक घाबरून गेले. पाणी शिरल्याने बोट समुद्रात बुडायला लागली. पंधरा ते वीस मिनिटांनंतर बचावकार्यासाठी दुसरी मोठी बोट आली. त्यांनी आम्हाला एकेकाला सुखरूपपणे त्यात बसवले. या मदतीमुळे आमचा जीव वाचू शकला. – पर्यटक

बोटीत पाणी शिरले, १५ मिनिटे पोहल्याने बचावलो

एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले, ‘मी ३.३० वाजता बोट पकडली. १० किमी प्रवास केला. तेवढ्यात स्पीड बोट आली आणि आमच्या बोटीला धडक दिली. आमच्या बोटीवरील कर्मचाऱ्यांनी तातडीने लाइफ जॅकेट घालायला सांगितले. मी बोटीच्या वर होतो. खाली येऊन जॅकेट घालेपर्यंत बोटीत पाणी शिरले होते. मी पुन्हा बोटीच्या वर गेलो. १५ मिनिटे पोहत होतो. तोपर्यंत दुसरी बोट आली आणि त्या बोटीने मला वाचवले.’

असा घडला अपघात

बचाव पथकाने लाइफ जॅकेट घालून अनेकांना समुद्रकिनारी आणले. त्यापैकी काही बेशुद्धच होते. बुडालेल्या लोकांना सीपीआर देऊन वाचवण्याचे प्रयत्न करण्यात आले. जेएनपीटी रुग्णालयात ५६ जण दाखल आहेत. त्यापैकी ३ जण गंभीर आहेत. नेव्ही डॉकयार्डमध्ये ९ जण दाखल आहेत, पैकी एक जण गंभीर. सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये ९ जण दाखल असून त्या सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

नौदलाच्या बोटीला नवे इंजिन लावल्याने चाचणी सुरू होती. समुद्रात ही बोट ‘8’ चा आकडा काढत असल्याचे व्हिडिओतून दिसतेय. इंजिनमध्ये तांत्रिक अडचण आल्याने चालकाचा ताबा सुटून स्पीड बोट प्रवासी बोटीवर आदळली, असा प्राथमिक अंदाज नौदलाने व्यक्त केला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 3 3 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे