
उपसंपादक – कल्पेश महाले
भुसावळ – महावितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंत्यास नवीन सर्विस कनेक्शनच्या क्षमता वाढसाठी २० हजारांची लाच स्वीकारताना जळगाव लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले असून प्रशांत प्रभाकर इंगळे, उप कार्यकारी अभियंता म.रा.वि.वि कंपनी मर्या. (चोरवड) भुसावळ असे त्याचे नाव आहे.
यातील तक्रारदार हे शासकीय विद्युत ठेकेदार असुन त्यांनी एका खाजगी कंपनीचा NSC या स्किम अंतर्गत नवीन सर्व्हिस कनेक्शनची क्षमतावाढ १०० वॅट हून २०० वॅट करण्याकरीताचा प्रस्ताव प्रशांत प्रभाकर इंगळे, उप कार्यकारी अभियंता यांचे कडे कार्यकारी अभियंता याना पाठविण्यासाठी प्रलंबित होता. सदरचा प्रस्ताव कार्यकारी अभियंता, भुसावळ यांचेकडे पाठविण्यासाठी प्रशांत प्रभाकर इंगळे, उप कार्यकारी अभियंता यांनी तक्रारदार यांच्याकडे २५ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. म्हणून तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगांव येथे तक्रार दिली होती. सदर तक्रारी प्रमाणे काल दि.२२ जानेवारी रोजी पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता यातील प्रशांत प्रभाकर इंगळे, उप कार्यकारी अभियंता यांनी प्रथम २५ हजार रुपयांची लाचेची मागणी करून तडजोडीअंती २० हजार रुपये लाच घेण्याचे मान्य करुन दि. २२ रोजी लाचेची २० हजार रुपये रक्कम रंगेहाथ स्वीकारली म्हणून भुसावळ तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रशांत प्रभाकर इंगळे, उप कार्यकारी अभियंताच्या टेबल वरून तक्रारदार यांचा प्रलंबित कामाचा प्रस्ताव तपासकामी ताब्यात घेण्यात आला आहे. या कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्यातील महावितरण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
यांच्या पथकाने केली कारवाई
सदरची कारवाई जळगांव एसीबी चे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, पो.ना.बाळू मराठे, पो.कॉ.अमोल सुर्यवंशी यांच्या पथकाने केली.