जळगांव शहर पोलीस स्टेशनचे दोन लाचखोर पोलीस हवालदार २० हजार रुपयांची लाच रंगेहात स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात.

उपसंपादक – कल्पेश महाले
जळगांव – यातील तक्रारदार पुरुष वय ४२ वर्ष हे केंद्रीय अर्धसैनिक बल मध्ये कॉन्स्टेबल पदावर कार्यरत आहेत. त्यांचे व त्यांची पत्नी यांचे कौटुंबिक कारणावरून भांडण झाले होते. त्याबाबत त्यांच्या पत्नीने तक्रारदार यांचे विरुद्ध दिनांक ०४/०२/२०२५ रोजी जळगांव शहर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्याच्या चौकशी कामी 1)रविंद्र प्रभाकर सोनार, वय- ४७ वर्ष, धंदा-नोकरी, पोलीस हवालदार नेमणूक जळगांव शहर पोलीस स्टेशन यांनी तक्रारदार यांना फोन करून चौकशीकामी पोलीस स्टेशन येथे बोलावून घेतले होते. त्यांनी 2)धनराज निकुंभ, धंदा-नोकरी, पोलीस हवालदार नेमणूक जळगांव शहर पोलीस स्टेशन यांचेसोबत भेट घेऊन त्यांना गुन्ह्याचे तपासकामी अटक न करण्यासाठी, योग्य ती मदत करण्यासाठी तसेच त्यांचा वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल न पाठवण्यासाठी स्वतःसाठी व सोनार साठी ५० हजार रुपयाची मागणी केली होती.
पोलीस हवालदार धनराज निकुंभ याने तक्रारदार यांच्याकडे तगादा लावल्याने तक्रारदार यांनी दि.११/०४/२०२५ रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग जळगाव येथे तक्रार दिली. प्राप्त तक्रारीवरून दि.११/०४/२०२५ रोजी करण्यात आलेल्या पडताळणी कारवाईदरम्यान पोलीस हवालदार धनराज निकुंभ याने तक्रारदार यांना ५० हजार रुपयांची लाचेची मागणी करून तडजोडीअंती २०,०००/- रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविली. त्यावरून काल दिनांक ११/०४/२०२५ रोजी सापळा कार्यवाही दरम्यान पोलीस हवालदार रवींद्र सोनार याने लाच रक्कम २०,०००/- रुपये पंचासमक्ष स्वतः स्वीकारली असता आरोपी पोलीस हवालदार रवींद्र सोनार व पोलीस हवालदार धनराज निकुंभ या दोघांना जळगांव एसीबी पथकाने अटक केली असून या दोघांविरुद्ध जळगांव शहर पोलीस स्टेशन येथे कलम ७,१२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या दोन्ही अटक केलेल्या आरोपीना मा .न्यायालयाने दिनांक १४/०४/२०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनवली आहे.
यांच्या पथकाने केली कारवाई
सदरची कारवाई ला. प्र. वि. जळगांव पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील चालक, पोहेकॉ रविंद्र घुगे, पोहेकॉ.जनार्दन चौधरी चालक, पोहेकॉ.सुनिल वानखेडे, पोना.बाळू मराठे, पोकॉ.राकेश दुसाने यांच्या पथकाने केली.