अब्दुल सत्तारांच्या विरोधात तक्रारीची निवडणूक आयोगाकडून गंभीर दखल : २४ तासात अहवाल सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
उपसंपादक – कल्पेश महाले
छत्रपती संभाजीनगर – सिल्लोड मतदारसंघातील शिंदेसेनेचे उमेदवार अब्दुल सत्तार यांनी दिलेल्या शपथपत्रात १६ चुका असल्याची तक्रार, सिल्लोड येथील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे करण्यात आल होती. सत्तार यांच्या शपथपत्रात मालमत्तांची, वाहनांची, दागिन्यांची माहिती लपवल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपेल्ली आणि डॉ. अभिषेक हरिदास यांनी केली होती. त्याची दखल घेत निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना २४ तासात अहवाल पाठवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सत्तार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मंत्री सत्तार यांनी शपथपत्रात दाखवलेल्या मालमत्तेचा तपशील आणि प्रत्यक्ष मालमत्ता यात तफावत आहे. अनेक मालमत्तांचे क्षेत्रफळ चुकीचे दाखवले आहे. मालमत्तांवर करण्यात आलेल्या बांधकामाच्या गुंतवणुकीची माहिती दाखवली नाही. काही मालमत्तांची माहिती शपथपत्रातून गायब आहे. विविध सहकारी संस्थांमध्ये सत्तार त्यांच्याकडे असलेल्या शेअर्सबाबतही खोटी माहिती देण्यात आली असल्याचा आरोप शंकरपेल्ली व डॉ. हरिदास यांनी केला आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीतही सत्तार यांनी अनेक गोष्टी लपवल्या होत्या. त्यामुळे सत्तार यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी अशी मागणी केली, यामध्ये करण्यात आली आहे.
प्रशासनाच्या अहवालाकडे लक्ष
या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने आता अहवाल निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात येणार आहे. त्या अहवालावर अब्दुल सत्तार यांचे राजकीय भविष्य अवलंबून असेल. त्यामुळे या अहवालाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. अब्दुल सत्तार हे शिवसेनेचे उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार सुरेश बनकर हे मैदानात आहेत. बनकर हे भाजपचे पदाधिकारी होते. मात्र, सत्तार यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी पक्षांतर केले आहे. त्यातच सिल्लोड भाजप विरुद्ध अब्दुल सत्तार असे समिकरण मतदारसंघामध्ये दिसून येत आहे.