दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर महसूल व जलसंपदामंत्र्यांचे लक्ष; पातरखेडे येथे पिकांची पाहणी…!
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर महसूल व जलसंपदामंत्र्यांचे लक्ष; पातरखेडे येथे पिकांची पाहणी...!

इमरान शेख उपसंपादक
सत्यकाम न्यूज डिजिटल मीडिया नेटवर्क एरंडोल
एरंडोल : राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज एरंडोल विधानसभा मतदारसंघातील एरंडोल तालुक्यातील पातरखेडे येथे दुष्काळग्रस्त भागातील पिकांची पाहणी केली.
यावेळी मतदारसंघातील सध्याच्या दुष्काळी परिस्थितीची वस्तुस्थिती महसूलमंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. पावसातील मोठ्या खंडामुळे पिकांची झालेली दयनीय अवस्था, शेतकऱ्यांसमोरील आर्थिक संकट तसेच दुष्काळामुळे निर्माण झालेल्या विविध अडचणींबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
एरंडोल विधानसभा मतदारसंघातील पारोळा, एरंडोल व भडगाव हे तिन्ही तालुके दुष्काळग्रस्त घोषित झाले असून, या घोषणेची तातडीने प्रभावी अंमलबजावणी करून दुष्काळग्रस्त शेतकरी व नागरिकांना शासनाच्या विविध सवलती, मदत व योजनांचा लाभ लवकरात लवकर मिळावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
तसेच पीक नुकसानीचे पंचनामे, शासकीय मदत आणि दुष्काळी उपाययोजनांच्या अंमलबजावणीत कोणताही विलंब होऊ नये, यासाठी संबंधित प्रशासनाला आवश्यक त्या सूचना देण्याची विनंतीही करण्यात आली.
यावेळी जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिताताई वाघ, एरंडोल पारोळ -भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल पाटील,जिल्हाधिकारी रोहन घुगे, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर, आमदार मंगेशदादा चव्हाण, आमदार नंदकिशोर महाजन, शिवसेना जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख, शिवसेना गटनेते तथा नगरसेवक प्रा. पै. मनोजभाऊ पाटील, पारोळा नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, उपजिल्हाप्रमुख मनिषभाऊ पाटील, एरंडोल येथील जावेद मुजावर, अंतुर्ली सरपंच गौरव पाटील यांचेसह विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, यावेळी स्थानिक शेतकरी बांधवांनी आयोजित केलेल्या पिठलं-भाकरीच्या भोजनाचा मंत्री महोदयांसह उपस्थित मान्यवरांनी मनमुराद आस्वाद घेतला….



