पवित्रा पोर्टलवर उर्दू माध्यमाच्या रिक्त पदांचा समावेश करावा उर्दू शिक्षक संघाची आमदार किशोर अप्पा पाटील यांच्याकडे मागणी…!
पवित्रा पोर्टलवर उर्दू माध्यमाच्या रिक्त पदांचा समावेश करावा उर्दू शिक्षक संघाची आमदार किशोर अप्पा पाटील यांच्याकडे मागणी...!

इमरान शेख उपसंपादक
पाचोरा, येथे दि. 11 ऑगस्ट रोजी पवित्रा पोर्टलद्वारे सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत उर्दू माध्यमाच्या रिक्त जागा पोर्टलवर अपलोड न झाल्याने उमेदवारांच्या हक्कांवर गदा येत असल्याचा मुद्दा आज अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ (11138) च्या शिष्टमंडळाने पाचोरा भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर अप्पा पाटील यांच्यासमोर मांडला.
संघटनेचे संस्थापक साजिद निसार अहमद यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात आकीब शेख सर व मुजाहिद खान सर यांचा समावेश होता. या महत्त्वाच्या बैठकीत उर्दू माध्यमाच्या रिक्त पदांचा प्रश्न प्राधान्याने उपस्थित करण्यात आला.
शिष्टमंडळाने सांगितले की, सर्व जिल्हा परिषदा, महानगरपालिका आणि नगरपालिका संस्थांमधील उर्दू माध्यमाच्या ज्या रिक्त जागांची माहिती अद्याप पवित्रा पोर्टलवर अपलोड झालेली नाही, त्यामुळे पात्र उमेदवारांना अर्ज करण्यापासून वंचित राहावे लागत आहे.
यावर आमदार किशोर पाटील यांनी संबंधित संस्थांशी तसेच शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याशी थेट संपर्क साधून रिक्त पदांची माहिती तातडीने पोर्टलवर अपलोड करण्याबाबत चर्चा करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
बैठकीत असेही स्पष्ट करण्यात आले की, ज्या संस्थांना मंजुरी व आदेश जारी करण्यात आले आहेत, तेथील उर्दू माध्यमाच्या सर्व उपलब्ध रिक्त जागांचा आढावा घेऊन त्या भरती प्रक्रियेत समाविष्ट करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील.
या प्रसंगी अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाचे कार्यकर्ते मुजाहिद खान सर, आकीब शेख सर यांच्यासह उर्दू माध्यमाचे अनेक उमेदवार उपस्थित होते.
उर्दू माध्यमाच्या उमेदवारांनी आमदारांच्या या सकारात्मक भूमिकेबद्दल समाधान व्यक्त केले आहे.



