विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्ती प्रक्रियेचा आढावा गाव-गावात शासनाचा दुवा तयार होणार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली SEO नियुक्ती बैठक संपन्न…!
विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्ती प्रक्रियेचा आढावा गाव-गावात शासनाचा दुवा तयार होणार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली SEO नियुक्ती बैठक संपन्न...!

जळगाव प्रतिनिधी:-कलीम सैय्यद
महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशानुसार राज्यात प्रत्येक 500 मतदारांमागे एक या प्रमाणे सुमारे 1.94 लाख विशेष कार्यकारी अधिकारी (SEO) नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या नियुक्ती प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी आज जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. गुलाबरावजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.
या पदांसाठी किमान 10 वी उत्तीर्ण, वय 25 ते 65 वर्षे आणि 5 वर्षांचा कार्यकाळ निश्चित करण्यात आला आहे. ही पदे मानसेवी असतील. जिल्हास्तरावर पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्तीसाठी समिती कार्यरत आहे.
बैठकीत एरंडोलसह जळगाव जिल्ह्यातील विविध विधानसभा मतदारसंघातील SEO नियुक्ती प्रक्रियेवर चर्चा झाली.
SEO हे शासन आणि नागरिक यांच्यातील महत्त्वाचा दुवा असतील. कागदपत्रे साक्षांकित करणे, प्रतिज्ञापत्र, चारित्र्य प्रमाणपत्र, स्थानिक दाखल्यांवर स्वाक्षरी, शासकीय योजनांची माहिती पोहोचवणे आणि ग्रामसभेत सहभागी होणे ही त्यांची प्रमुख जबाबदारी असेल.
बैठकीला आमदार किशोरआप्पा पाटील, आमदार अमोल दादा पाटील, जिल्हाधिकारी रोहन घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर, जिल्हा नियोजन अधिकारी भरत साळुंखे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.



