महाराष्ट्र अलर्ट मोडवर: मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक; कोकण किनारपट्टी भागात सुरक्षा वाढवली; मुंबईत समुद्र किनारी न जाण्याचे निर्देश.

उपसंपादक – कल्पेश महाले
मुंबई – भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपत्कालीन सुरक्षा बैठक बोलावली आहे. आज दुपारी होणाऱ्या या बैठकीचा उद्देश सध्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेणे आणि राज्यभरातील सुरक्षा उपाययोजनांचा आढावा घेणे आहे. दरम्यान महाराष्ट्राला अलर्ट राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
कोकण किनारपट्टी भागामध्ये पोलीसांची गस्त
या सर्व परिस्थिती मुळे कोकण किनारपट्टी परिसर देखील अलर्ट मोडवर ठेवण्यात आला आहे. कोकण किनारपट्टी भागामध्ये पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे. रात्री पोलिसांकडून वाहनांची तपासणी करण्यात येत असून नाकेबंद देखील करण्यात आली आहे. कोणतेही वाहन तपासणी शिवाय सोडले जात नाही. दरम्यान रेडी, विजयदुर्ग, मालवण, देवगड, निवती, पाचोरा आणि वेंगुर्ला बंदर या परिसरात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याचे निर्देश
मुंबई पोलीसांनी सर्व कर्मचाऱ्यांसाठी नवीन रजा मंजूर करणे स्थगित केले आहे. वैयक्तिक आपत्कालीन परिस्थिती शिवाय कोणत्याही पदासाठी रजा मंजूर करू नये असे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. सर्व कर्मचाऱ्यांना अधिकार क्षेत्रात राहण्याचे आणि सतर्क राहण्याचे निर्देश मुंबई पोलीसांच्या वतीने देण्यात आले आहेत.
महाराष्ट्रात अलर्ट
पाकिस्तानमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यानंतर महाराष्ट्रात अलर्ट देण्यात आले आहे हे उल्लेखनीय आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या प्रतिष्ठानांची, पर्यटन स्थळांची, आध्यात्मिक स्थळांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्या सर्व ठिकाणी अधिक दक्षता ठेवण्याच्या सूचना पोलीसांना देण्यात आल्या आहे.
आपत्कालीन सुरक्षा बैठक
भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपत्कालीन सुरक्षा बैठक बोलावली आहे. आज दुपारी होणाऱ्या या बैठकीचा उद्देश सध्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेणे आणि राज्यभरातील सुरक्षा उपाययोजनांचा आढावा घेणे आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या व्यतिरिक्त, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी सांगितले होते की, सुरक्षेबाबत बैठक घेतली जाईल. पोलीस सज्ज आहेत आणि लोकांना सतर्क करण्यासाठी मॉक ड्रिल आयोजित केले जात आहेत.