कासोदा पोलीस स्टेशनतर्फे शांतता समितीची बैठक संपन्न;श्री गणेशोत्सव व हरिनाम सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर विशेष आयोजन…!
कासोदा पोलीस स्टेशनतर्फे शांतता समितीची बैठक संपन्न;श्री गणेशोत्सव व हरिनाम सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर विशेष आयोजन...!

इमरान शेख उपसंपादक
कासोदा शहरातील आगामी श्री गणेशोत्सव आणि श्री सदगुरु गोविंद महाराज यांच्या पावन स्मरणार्थ दरवर्षीप्रमाणे यंदाही आयोजित करण्यात आलेला अखंड हरिनाम सप्ताह हे दोन्ही उत्सव शांततेत, सौहार्दपूर्ण वातावरणात आणि उत्साहात पार पडावेत, या उद्देशाने आज सोमवार दि. ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता कासोदा पोलीस स्टेशनच्या प्रांगणात शांतता समितीच्या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीला अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांचा सत्कार सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील यांनी केला.
तसेच हरिनाम सप्ताह पंच मंडळाचे अध्यक्ष नंदू खैरनार यांचा सत्कार अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
बैठकीच्या सुरुवातीला नरेंद्र गजरे यांनी प्रास्ताविक मांडून बैठकीचा मुख्य उद्देश स्पष्ट केला. त्यानंतर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच उत्सवाचे नियोजन सुरळीत व्हावे यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील, नरेंद्र पाटील, उमेश पाटील, मुक्तार सर आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
वक्त्यांनी गावातील पारंपरिक हिंदू-मुस्लिम सलोखा कायम राखण्याचे, कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि दोन्ही उत्सव काळात पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.
या बैठकीला कासोदा गावातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, मुस्लिम पंच कमिटीचे पदाधिकारी, पोलीस पाटील, पत्रकार बांधव पत्रकार सागर शेलार , ॲड. वासुदेव वारे,पत्रकार शैलेश पांडे उपस्थित होते.
तसेच मोठ्या संख्येने नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले आणि सामूहिक राष्ट्रगीताने बैठकीची सांगता झाली.



