
उपसंपादक – कल्पेश महाले
पारोळा – तालुक्यातील मेहू गावातील सरपंच आणि त्याच्या कुटुंबातील तिघांना लाच प्रकरणात जळगाव एसीबीने अटक केली आहे. या प्रकरणात सरपंच जिजाबाई गणेश पाटील, सरपंच पती गणेश सुपडू पाटील, सरपंच मुलगा शुभम गणेश पाटील आणि सेतू सुविधा केंद्राचा खाजगी पंटर समाधान देवसिंग पाटील यांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. एकाच कुटुंबातील तीन सदस्यांना लाच प्रकरणात अटक झाल्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे.
नेमके काय आहे लाच प्रकरण
२०१७-१८ ते २०२२-२३ या कालावधीत मेहू गावाचे सरपंच असलेले ४७ वर्षीय तक्रारदार यांनी ग्रामपंचायतीच्या व्यायामशाळेच्या बांधकामासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातून सात लाखांचा निधी मंजूर करून घेतला होता. २०२३ मध्ये जिजाबाई पाटील यांची सरपंच म्हणून निवड झाली त्यानंतर तक्रारदार यांनी व्यायामशाळेच्या मंजुरीत दिलेल्या निधीसाठी सरपंचांकडे मागणी केली.
यावेळी सरपंच जिजाबाई पाटील यांनी संबंधित कन्स्ट्रक्शन कंपनीसाठी चार लाखांचा धनादेश दिला आणि उर्वरित तीन लाख रुपयांचे धनादेश देण्याच्या मोबदल्यात लाच मागितली. तक्रारदारला १ लाख रुपये ३१ जानेवारी २०२५ रोजी व नंतर ७० हजार रुपये लाच देण्यास सांगितले होते. त्यानंतर सरपंच पती गणेश पाटील यांनी तडजोडअंती ४० हजार रुपयांची लाच मागितली.
संपूर्ण सापळ्याची कार्यवाही
तक्रारीच्या तपासानंतर एसीबी पथकाने मेहू गावात आज दिनांक १२ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी सापळा रचला. खाजगी पंटर समाधान पाटील याला ४० हजार रुपये स्वीकारताना रंगेहात पकडले आणि त्यानंतर अन्य तीन आरोपींना अटक केली. आरोपींच्या अंगझडतीत १० हजार १७० रुपये आणि सरपंच मुलगा शुभम पाटील याच्याकडून गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेला ३ लाख रुपयांचा चेक जप्त करण्यात आला आहे.
यांच्या पथकाने केली कारवाई
सदरची करवाई जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव, पोलीस उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, पो.कॉ.राकेश दुसाने, पो. कॉ.अमोल सूर्यवंशी यांच्या पथकाने केली.