Breaking
ब्रेकिंग

वाढदिवसाच्या शुभेच्छा शब्दांत नव्हे, नागरिकांच्या उपयोगी कामातून देऊया! आमदार ॲड. अमोलदादा पाटील..!

वाढदिवसाच्या शुभेच्छा शब्दांत नव्हे, नागरिकांच्या उपयोगी कामातून देऊया! आमदार ॲड. अमोलदादा पाटील..!

1 1 2 6 3 0

सत्यकाम न्यूज नेटवर्क पारोळा :-इमरान शेख उपसंपादक

पारोळा शहरातील विविध विकासकामांचा भव्य भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न!

पारोळा नगरपरिषद हद्दीत लोकप्रिय आमदार मा.दादासाहेब ॲड. अमोलदादा पाटील यांच्या अथक प्रयत्नांतून मंजूर झालेल्या विविध विकासकामांचा भव्य भूमिपूजन व लोकार्पण सोहळा आज शहरातील साने गुरुजी कॉलनी येथे आमदार मा.दादासाहेब ॲड. अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. शहराच्या विविध भागांतील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासोबतच नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या या विकासकामांमुळे पारोळा शहराच्या विकासाला निश्चितच नवी गती मिळणार आहे.

याप्रसंगी पारोळा पंचायत समितीचे मा.सभापती अरुणआबा पाटील, मा.नगराध्यक्ष गोविंदआबा शिरोळे, मा.नगराध्यक्ष अशोकदादा वाणी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर, उपनगराध्यक्ष ॲड.रोहन मोरे, शिवसेना तालुकाप्रमुख मधुकरआबा पाटील, शिवसेना शहरप्रमुख, गटनेते तथा नगरसेवक अमृतभाऊ चौधरी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा नगरसेवक मनिषभाऊ पाटील, भाजपा महिला जिल्हा उपाध्यक्षा ॲड.कृतिकाताई आफ्रे, मा.उपनगराध्यक्ष सुदामबापू चौधरी, भाजपा चिटणीस धिरज महाजन, शिवसेना उपगटनेते तथा नगरसेवक पंकजभाऊ मराठे, शिवसेना प्रतोद तथा नगरसेवक नितीन सोनार, नगरसेविका किरणताई पाटील, नगरसेवक मनोजभाऊ जगदाळे, प्रमोद कासार, राजूभाऊ कासार, राजूबापू पाटील, बापू मिस्तरी, छोटू पाटील, भावडू राजपूत, विवेक पाटील, नजीरखान बेलदार, दिपक अनुष्ठान, भूषण टिपरे, इमरान शेख यांचेसह आदी मान्यवर, श्री स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक विकास व बालसंस्कार सेवा केंद्राचे सेवेकरी, या परिसहासह शहरातील नागरिक, पत्रकार उपस्थित होते.

या कार्यक्रमाची सुरुवात साने गुरुजी कॉलनी परिसरातील श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास व बालसंस्कार सेवा केंद्र (दिंडोरी प्रणित) येथे श्री स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक होत मनोभावे दर्शन घेऊन करण्यात आली. श्री स्वामींचे आशीर्वाद घेतल्यानंतर विविध विकासकामांच्या भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यास सुरुवात झाली.

याच मंगलप्रसंगी देशाचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस आणि पारोळा नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांचा वाढदिवस असा दुहेरी योग साधत, नागरिकांच्या सेवेसाठी विविध विकासकामे प्रत्यक्षात आणण्यात आली. आमदार मा.दादासाहेब ॲड. अमोलदादा पाटील यांनी मा. नरेंद्रजी मोदी आणि मा. चंद्रकांतदादा पाटील यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा देत त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि निरंतर जनसेवेचे बळ लाभावे, अशा सदिच्छा व्यक्त केल्या.

यावेळी आपल्या मनोगताच्या सुरुवातीस “जय हिंद! जय महाराष्ट्र!” अशी घोषणा देत आमदार मा.दादासाहेब ॲड. अमोलदादा पाटील यांनी हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन केले. वंदनीय बाळासाहेबांच्या नेतृत्वातून मिळालेला स्वाभिमान, विचारांवरील निष्ठा, निर्णय घेण्याची हिंमत आणि सामान्य माणसाशी असलेले आपुलकीचे नाते ही प्रेरणा आपल्या सार्वजनिक जीवनात कायम मार्गदर्शक राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर मा. नरेंद्रजी मोदी यांच्या कार्यातून मोठे ध्येय निश्चित करून त्यासाठी सातत्याने परिश्रम, नियोजन आणि विकासाभिमुख कार्य करण्याची प्रेरणा मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.

वाढदिवसाच्या शुभेच्छा केवळ शब्दांत देण्यापेक्षा नागरिकांच्या उपयोगी पडणाऱ्या कामातून व्यक्त केल्या पाहिजेत,” अशी भावना व्यक्त करत आमदार अमोलदादांनी आजच्या कार्यक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. नागरिकांसाठी उद्यान, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, गटारी आणि इतर मूलभूत सुविधा निर्माण करणे हीच लोकप्रतिनिधी म्हणून खरी जनसेवा असल्याचे त्यांनी सांगितले.

याच भावनेतून साकारण्यात आलेल्या ‘हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे नमो उद्यान’ या उद्यानाचे आज लोकार्पण करण्यात आले. या उद्यानाला देण्यात आलेल्या नावामध्ये वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांविषयीचा आदर आणि मा. नरेंद्रजी मोदी यांच्या विकासाभिमुख कार्याबद्दलचा सन्मान सामावलेला असल्याचे आमदार अमोलदादांनी सांगितले. दोन्ही नेतृत्वांचे कार्यक्षेत्र आणि राजकीय प्रवास वेगळा असला, तरी विचारांवरील निष्ठा, मोठे ध्येय ठेवण्याची वृत्ती, परिश्रम आणि सामान्य माणसाशी जोडलेले नाते या मूल्यांतून प्रेरणा घेऊन ती प्रेरणा आपल्या स्थानिक विकासकामांत उतरवणे हीच या नामकरणामागील भावना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

उद्यानाच्या प्रवेशद्वारावर बाळासाहेबांचे नाव असावे आणि उद्यानाच्या व्यवस्थेत नागरिकांविषयी आपुलकी असावी. येथे येणाऱ्या प्रत्येकाला स्वच्छता, शिस्त, सुरक्षितता आणि आनंदाचा अनुभव मिळावा, हीच वंदनीय बाळासाहेबांना खरी आदरांजली ठरेल,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

पारोळा शहराच्या विकासाबाबत बोलताना आमदार अमोलदादांनी शहराच्या भविष्यासाठी स्पष्ट प्राधान्यक्रम निश्चित करून काम करण्याचा संकल्प व्यक्त केला. नागरिकांना स्वच्छ व नियमित पाणीपुरवठा मिळावा, रस्ते व गटारींची कामे दर्जेदार आणि टिकाऊ व्हावीत, पावसाळ्यात पाण्याचा निचरा सुरळीत व्हावा, शहर स्वच्छ व प्रकाशमान राहावे, तरुणांना अभ्यास, कौशल्य व रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आवश्यक सुविधा निर्माण व्हाव्यात तसेच शहरातील मोकळ्या जागांचा विकास करून हरित व सुंदर पारोळा घडवावा, यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे त्यांनी सांगितले.

विकासकामाच्या फलकावर आपले नाव येणे हा सन्मान आहे; मात्र त्या कामामुळे एखाद्या आजीला बसण्यासाठी चांगली जागा मिळते, एखाद्या आईला मुलांसाठी खेळण्याची सुरक्षित जागा मिळते किंवा एखाद्या नागरिकाच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटते, हेच लोकप्रतिनिधी म्हणून खरे समाधान आहे,” अशी भावना आमदार अमोलदादांनी व्यक्त केली.

नगराध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांचा वाढदिवसही यावेळी विशेष पद्धतीने साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त केवळ शुभेच्छांचा कार्यक्रम न ठेवता महाआरोग्य शिबिर आणि भव्य रक्तदान शिबिर आयोजित करून नागरिकांच्या आरोग्याची काळजी आणि सामाजिक बांधिलकी जपल्याबद्दल आमदार अमोलदादांनी चंद्रकांतदादांचे विशेष कौतुक केले. महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना आरोग्य तपासणी व वैद्यकीय मार्गदर्शन मिळत असून, रक्तदान शिबिराच्या माध्यमातून गरजू रुग्णांसाठी रक्त उपलब्ध होण्यास मदत होत असल्याचे सांगत, “वाढदिवसाचा आनंद समाजासाठी उपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्याची ही पद्धत निश्चितच प्रेरणादायी आहे,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

यावेळी नगराध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनीही मनोगत व्यक्त करताना आमदार मा. ॲड. अमोलदादा पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे पारोळा शहरासाठी मोठ्या प्रमाणावर विकासनिधी उपलब्ध होत असून, शहराच्या विकासाला गती मिळत असल्याचे सांगितले. वाढदिवसानिमित्त आयोजित महाआरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराला नागरिकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद हीच आपल्यासाठी वाढदिवसाची खरी भेट असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. नागरिकांच्या सेवेसाठी विकासकामांसोबतच सामाजिक उपक्रमांची ही वाटचाल भविष्यातही सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

यावेळी देशाचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या संविधानिक पदावरील कारकिर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त दि. १७ सप्टेंबर २०२६ ते दि. १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्यात राबविण्यात येणाऱ्या ‘सेवा संकल्प अभियानाचा’ शुभारंभही आमदार मा.दादासाहेब ॲड. अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला. सेवा, विकास आणि नागरिकांपर्यंत लोककल्याणकारी उपक्रम पोहोचविण्याच्या भावनेतून या अभियानात जनसहभाग वाढविण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

दरम्यान, WTP जलशुद्धीकरण केंद्र येथे वॉल कंपाउंड बांधकाम व इतर अनुषंगिक कामे करण्यासाठी २ कोटी ५० लाख रुपये, तलाठी कॉलनी येथे वॉल कंपाउंड व काँक्रीट रस्ता करण्यासाठी २ कोटी ४० लाख रुपये, दिल्ली दरवाजा पाण्याच्या टाकी परिसरात वॉल कंपाउंड बांधकाम व इतर अनुषंगिक कामांसाठी १ कोटी ४० लाख रुपये, पिर दरवाजा ते मडक्या मारोती चौकापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण व गटार बांधकामासाठी १ कोटी ६५ लाख रुपये, घनकचरा प्रकल्प येथे काँक्रीटीकरणासाठी ८८ लाख रुपये, तसेच श्री राजे छत्रपती शिवाजी महाराज, श्री सद्गुरू निजानंदीताई महाराज, श्री साई नगर, श्री व्यंकटेश नगर, श्री पाताळेश्वर महादेव मंदिर व बाबा मिश्किन प्रवेशद्वारांच्या बांधकामासाठी ९५ लाख रुपये अशा विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.

तसेच १ कोटी रुपये खर्चातून साकारण्यात आलेल्या ‘हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे नमो उद्यानाचे’ लोकार्पण करण्यात आले. या उद्यानामुळे लहान मुलांना खेळण्यासाठी, ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळ्यासाठी, माता-भगिनींना निवांत वेळ घालवण्यासाठी तसेच नागरिकांना स्वच्छ व सुंदर वातावरणात वेळ घालवण्यासाठी एक चांगली सार्वजनिक जागा उपलब्ध झाली आहे.

पारोळा शहराच्या विकासासाठी नगराध्यक्ष म्हणून चंद्रकांतदादांचा स्थानिक पातळीवरील पुढाकार आणि आमदार म्हणून शासनदरबारी विकासकामांसाठी अमोलदादांचा पाठपुरावा, या समन्वयातून शहरातील प्रश्न मार्गी लावण्यावर भर देण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. नागरिकांच्या प्रश्नांना केवळ आश्वासने न देता त्यांना योग्य दिशा देऊन प्रत्यक्ष कामातून उत्तर देणे, हीच जनसेवेची भूमिका असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.

विकासकामे, सामाजिक उपक्रम आणि नागरिकांचा सहभाग यांच्या माध्यमातून पारोळा शहर अधिक स्वच्छ, सुंदर, सक्षम, हरित आणि सुविधासंपन्न करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांची प्रेरणा घेऊन, विकासाची दृष्टी आणि जनसेवेची बांधिलकी जपत पारोळ्याच्या सर्वांगीण विकासाची ही वाटचाल अशीच अविरत सुरू राहणार…

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 1 2 6 3 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे