
उपसंपादक – कल्पेश महाले
धुळे – तक्रारदार हे मौजे बुडकी विहीर ता. शिरपुर येथील रहिवासी असून तक्रारदार यांच्या आईच्या नांवे सांगवी वनक्षेत्रात वनजमीन असुन तक्रारदार यांनी आईच्या नांवे सदर वन जमीनीवर सिंचन विहीर खोदण्यासाठी सन २०२३ – २०२४ मध्ये बिरसा मुंडा कृषि क्रांती योजने अंतर्गत ४,००,०००/- रु शासकीय अनुदान मंजुर होण्याकरीता आवश्यक कागदपत्रांसह दि.२०/०४/२०२२ रोजी ऑनलाईन अर्ज करुन त्यानुसार त्यांना सदर योजनेअंतर्गत विहीर खोदण्याकरीता ४,००,००० /- रु शासकीय अनुदान मंजुर झाले आहे. त्यामुळे योगेश पाटील, कृषि विस्तार अधिकारी, पंचायत समिती, शिरपुर याने तक्रारदार यांच्या आईच्या नांवे मंजुर झालेल्या सिंचन विहीरीच्या जागेची स्थळ पाहणी करुन तक्रारदार व त्यांच्या आईचा फोटो काढुन नेला होता. त्यावेळी कृषि विस्तार अधिकारी योगेश पाटील याने तक्रारदार यांना विहीरीचे लाईन आउट करतेवेळी ५,०००/- रु त्यांना द्यावे लागतील असे सांगितल्याने तक्रारदार यांनी दि.०७/०२/२०२५ रोजी ला. प्र. विभाग, धुळे कार्यालयात येवुन लेखी तक्रार दिली होती.
सदर तक्रारीची पंचासमक्ष आज दि. ०९/०२/२०२५ रोजी पडताळणी केली असता कृषि विस्तार अधिकारी योगेश पाटील याने तक्रारदार यांच्याकडे ५,०००/- रुपये लाचेची मागणी करुन सदर लाचेची रक्कम मौजे बोराडी ता. शिरपुर येथील स्टेट बँकेच्या समोर स्वतः स्विकारतांना त्याला रंगेहात पकडण्यात आले असुन त्यांचे विरुध्द शिरपुर तालुका पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
सदरची कारवाई नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप-अधीक्षक सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक पंकज शिंदे, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, पो.हवा.राजन कदम, मुकेश अहिरे, प्रविण मोरे, संतोष पावरा, रामदास बारेला, मकरंद पाटील, प्रविण पाटील, प्रशांत बागुल, सुधीर मोरे व जगदीश बडगुजर यांच्या पथकाने केली.