वेल्हाणेच्या विकासासाठी आवश्यक ती सर्व कामे पूर्णत्वास नेणार” आमदार अमोलदादा पाटील…!
वेल्हाणेच्या विकासासाठी आवश्यक ती सर्व कामे पूर्णत्वास नेणार” आमदार अमोलदादा पाटील...!

सत्यकाम न्यूज नेटवर्क डिजिटल मीडिया पारोळा
इमरान शेख उपसंपादक
वेल्हाणे खुर्द : पारोळा तालुक्यातील वेल्हाणे खुर्द येथे लोकप्रिय आमदार मा.ॲड. अमोलदादा पाटील यांच्या अथक प्रयत्नांतून मंजूर झालेल्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण आमदार मा.ॲड. अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना आमदार अमोलदादा पाटील यांनी वेल्हाणे गावाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध कामांना प्राधान्य देत आगामी काळातही विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. तसेच वेल्हाणे येथील श्रीराम मंदिर परिसरात सभामंडप उभारण्यासाठी ५० लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. त्याचबरोबर वेल्हाणे ते बाबरे या रस्त्याच्या दुरुस्तीसाठीही आवश्यक तो पाठपुरावा करून प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी आश्वासित केले.
वेल्हाणे गावाच्या दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ढोलीहून वेल्हाणे गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणासाठी १ कोटी रुपयांच्या भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर वेल्हाणे गावातील नागरिकांची दळणवळणाची मोठी समस्या दूर होणार असून, गावातील वाहतूक अधिक सुलभ होणार आहे. शेतीमालाची वाहतूक, बाजारपेठ, शिक्षण, आरोग्य तसेच दैनंदिन कामांसाठी होणाऱ्या प्रवासाला यामुळे मोठी सुविधा मिळणार आहे.
गावाच्या विकासासाठी केवळ रस्तेच नव्हे, तर सार्वजनिक सुविधा, धार्मिक व सामाजिक स्थळांचा विकास आणि नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या कामांना प्राधान्य देण्यात येत असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. वेल्हाणे खुर्दच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी आणून विकासकामांना गती देण्याचा निर्धार आमदार अमोलदादा पाटील यांनी व्यक्त केला.
या विकासकामांच्या भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यास शेतकी संघाचे मा. अध्यक्ष तथा संचालक चतुरभाऊसाहेब पाटील, जिल्हा परिषदेचे मा. कृषी सभापती डॉ. दिनकर पाटील, मा. जि.प. सदस्य भुराआप्पा पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख मधुकरआबा पाटील, पंचायत समितीचे मा. सभापती वसंतआप्पा पाटील, शेतकी संघाचे मा. उपाध्यक्ष सखारामनाना चौधरी, शेतकी संघाचे मा. अध्यक्ष डॉ. राजेंद्र पाटील, अध्यक्ष भैय्यासाहेब पाटील, तामसवाडी येथील सुभाष पवार यांच्यासह विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य, शिवसेना-युवासेनेचे आजी-माजी पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक व वेल्हाणे खुर्द येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वेल्हाणेच्या विकासाला मिळालेली ही नवी गती आणि मंजूर झालेल्या विविध विकासकामांमुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण असून, आगामी काळातही गावाच्या विकासाची ही वाटचाल अधिक वेगाने पुढे नेण्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला..



