सव्वातीन लाखांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या चोरट्यास सहा तासांत केले जेरबंद.

मेहुणबारे पोलीसांची कामगिरी, चोरी केलेला मुद्देमालही केला जप्त.
उपसंपादक – कल्पेश महाले
चाळीसगाव – तालुक्यातील देवळी येथील कुटुंब बाहेरगावी लग्नाला गेल्याची संधी साधून चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून सुमारे ३ लाख २० हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला होता. मेहुणबारे पोलीस स्टेशनला याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीसांनी शिताफीने तपास करून अवघ्या सहा तासात चोराच्या मुसक्या आवळल्या. चोरट्याने चोरी केलेली ३३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे सराफाकडून वितळून त्याची लगड केली होती. पोलीसांनी ३ लाख २० हजार रूपये किंमतीची सोन्याची लगड जप्त केली. प्रविण सुभाष पाटील (वय ३२) रा. बिलवाडी ता.जि. जळगाव असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. देवळी येथील दीपक नामदेव पाटील हे १६ रोजी सकाळी १० वाजता कुटुंबासह बाहेरगावी लग्नाला गेले होते. त्यामुळे घराला कुलूप होते. १८ रोजी रात्री ११.३० वाजता ते घरी परतले असता या दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील लोखंडी शोकेसचे लॉकर तोडून त्यातील ३३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे ३ लाख २५ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार उघडकीस येताच दीपक पाटील यांनी मेहुणबारे पोलीस स्टेशनला धाव घेत तक्रार दिली.
चोरीस गेलेले सोनेही केले हस्तगत
या चोरीच्या तपासाबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण दातरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विकास शिरोळे, सुहास आव्हाड, पो.हवा.गोकुळ सोनवणे, किशोर पाटील, शांताराम पवार, पो.कॉ.निलेश लोहार, विनोद बेलदार, संजय लाटे यांनी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहीतीच्या आधारे कौशल्याने गुन्ह्याचा तपास करून अवघ्या सहा तासात हा गुन्हा उघडकीस आणून सराईत चोरटा प्रविण सुभाष पाटील याला जेरबंद केले. त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देवून चोरी केलेले सोन्याचे दागिने एका सराफाकडून वितळून घेतल्याचे सांगितले. पोलीसांनी वितळलेल्या सोन्याची ३३ ग्रॅम वजनाची सुमारे ३ लाख २० हजार रूपये किंमतीची लगड प्रविण पाटील याच्याकडून जप्त केली आहे. त्याचेकडून चोरी व घरफोडीचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून पोलीस या सराईत चोरट्याची कसून चौकशी करीत आहेत.