खाकी वर्दीतील मेहुणबारे पोलीस स्टेशन येथील पोलीस कॉन्स्टेबल निलेश लोहार ठरले ८० वर्षीय अनोळखी बाबांसाठी देवदूत.

उपसंपादक – कल्पेश महाले
चाळीसगाव – तालुक्यातील सायगाव गावात रस्त्याच्या कडेला काल रात्री १०:३० च्या सुमारास अत्यावस्थ स्थितीत पडलेल्या वयोवृद्ध बाबांसाठी पोलीसांची खाकी सरसावली व त्या बाबांना निवारा उपलब्ध करून देत जेवणाचीही सोय केली. गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून अटक करणे, गुन्हे आटोक्यात आणणे आणि ते उघडकीस आणून आरोपींना शिक्षा होईपर्यंत पाठपुरावा करणे पोलीसांचे कर्तव्यच आहे. या पलीकडे जाऊन खाकी वर्दीतील या माणसांनी आपल्यातील माणुसकीचे दर्शन घडविले. याचाच एक प्रत्यय ८० वर्षीय अनोळखी वयोवृद्ध बाबांच्या बाबतीत नुकताच आला.
याबाबत सविस्तर माहिती अशी, की सायगाव गावात काल दिनांक १४ एप्रिल रोजी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीची मिरवणूकीचा बंदोबस्त आटपून मेहुनबारे पोलीस स्टेशनचे पो.कॉ.निलेश लोहार घरी निघाले असता त्यांना सायगाव बसस्टँड भागात रोडच्या बाजूला रात्री १०:३० ते ११:०० वाजेच्या दरम्यान अंदाजे ८० वर्षीय वयोवृद्ध बाबा अत्यावस्थ अवस्थेत मिळून आले. त्यांची पहिले त्यांनी विचारपूस केली त्यांना स्वतःबद्दल व त्यांच्या घराबद्दल कोणतीही माहिती सांगता आली नाही. जवळपास दोन ते तीन दिवसापासून त्यांना अन्न पाणी मिळाले नसून त्यांची तब्बेत अस्वस्थ झालेली होती.
अश्या वेळी खाकी वर्दीतील पोलीस कॉन्स्टेबल निलेश लोहार यांनी माणुसकीचा परिचय देत त्या बाबांना पाणी पाजले व अल्पोपहार दिला त्यानंतर स्वतःच्या वाहनात बसवून सदरील बाबांना शिरसगाव येथील देवाज बहुउद्देशीय संस्थेच्या आश्रमात दाखल केले.
या अनोळखी वयोवृद्ध बाबांना असेच सोडून दिले तर त्यांच्याबाबतीत काहीही घडू शकते. या दरम्यान पो.कॉ.निलेश लोहार यांना शिरसगाव येथील देवाज बहुउद्देशीय संस्थेविषयी माहित होते. त्यानुसार त्यांनी शिरसगाव येथील देवाज संस्थेच्या संबंधितांशी संपर्क साधला. व त्या अनोळखी बाबांना शिरसगाव येथे घेऊन गेले.
या ठिकाणी अगोदरच जवळपास ३५ निराधार राहत आहेत. देवाज संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी ८० वर्षीय अनोळखी वयोवृद्ध यांना त्यांच्या संस्थेत ठेवण्याबाबत होकार दिला. आणि सध्या हे ८० वर्षीय वयोवृद्ध येथे इतरांसोबत राहत आहे. दरम्यान या वयोवृद्ध यांच्या संदर्भात कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी देवाज संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या खाकी वर्दीतील मेहुणबारे पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल निलेश लोहार यांनी दाखविलेल्या माणुसकीबद्दल सर्वत्र परिसरातील त्यांचे कौतुक होत आहे.