ट्रकचालकाकडून ५० रुपयांची लाच घेणाऱ्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यासह तिघांवर अखेर निलंबनाची कारवाई.

उपसंपादक – कल्पेश महाले
पाचोरा – ट्रकचालकाकडून ५० रुपयांची लाच घेणं वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला चांगलंच महागात पडलंय. ट्रकचालकाला अडवत लाच घेणाऱ्या ट्रकचालकानं ५० रुपयाची नोट पुढं करताच आमची ५० रुपयाची इज्जत आहे का, किमान १०० तरी करा म्हणत हटून बसलेल्या वाहतूक पोलीसाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. या व्हिडिओनंतर जळगावचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी ५० रुपयांची लाच घेणाऱ्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यासह त्याला साथ देणाऱ्या अन्य दोन पोलीस कर्मचाऱ्याना निलंबीत केल्याची घटना घडल्याने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती असे की, व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पाचोरा तालुक्यातील वाहतूक पोलीस पवन पाटीलने केळी वाहतूक करणारे मालवाहतूक वाहन अडवून चालकाकडे ५०० रुपयांची मागणी केली. परंतु, चालक ५० पेक्षा एक रुपया जास्त देण्यास तयार नव्हता. शेवटी पोलीसाने, आमची इतकीच इज्जत आहे का? असे म्हणत मिळालेले पैसे नाईलाजाने स्वीकारले असल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे. पोलीसाला अद्दल घडविण्यासाठी पैसे घेतानाच व्हिडीओ ट्रकच्या कॅबिनवर बसलेल्या व्यक्तीने मोबाईलमध्ये बनवला. ट्रक चालक आणि पोलीस या दोघांमधील संभाषणाचा व्हिडिओ समाज माध्यमात टाकला होता.
या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी या घटनेची दखल घेत तातडीने चौकशी करून वाहतूक पोलीस पवन पाटीलला निलंबित केले आहे. या घटनेच्या प्राथमिक तपासात पवन पाटील याने ट्रकचालकाकडून ५० रुपये घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. या व्हिडिओमध्ये आणखी दोन पोलीस कर्मचारीही उपस्थित असल्याने त्यांची भूमिका संशयास्पद आढळून आली आहे. त्यामुळे त्यांनाही निलंबित करण्यात आले आहे.
मालवाहतूक गाडीच्या चालकाकडून पैसे मागितल्याच्या प्रकरणात संशयित असलेल्या तिन्ही कर्मचाऱ्यांच्या चौकशीची जबाबदारी आता पाचोरा भागाचे डी.वाय.एस.पी. धनंजय येरुळे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. सहाय्यक फौजदारासह अन्य दोन कर्मचारी तडकाफडकी निलंबित झाल्याच्या प्रकारानंतर पाचोरा तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून, या घटनेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असे पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी सांगितले आहे. यामुळे पोलीस यंत्रणेच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.