हरी ओम आय टी आय मध्ये नागरी संरक्षण विभागातर्फे आग सुरक्षितता व प्रथमोपचार या विषयावर कार्यशाळा संपन्न

उपसंपादक – कल्पेश महाले
चाळीसगांव – येथील हरि ओम औद्योगिक प्रशिक्षण संस्था,चाळीसगाव येथे नागरी संरक्षण विभाग ओझर, नाशिक यांच्यातर्फे आग सुरक्षितता व प्रथमोपचार (Fire Safety & First Aid) या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
कार्यशाळेत आग आटोक्यात आणण्यासाठी व आग सुरक्षिततेवर आधारित विविध प्रकारच्या प्रात्यक्षिकांद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी नागरी संरक्षण विभागाचे उपमुख्य क्षेत्ररक्षक आर.बी. बागुल यांनी घरगुती व औद्योगिक सुरक्षितता व प्रथमोपचार यावर मार्गदर्शन केले.
तसेच नैसर्गिक आपत्ती जसे की भूकंप, पूर, आग यासारख्या आपत्ती आली तर स्वतःचा व दुसऱ्याचा जीव कसा वाचवायचा याचे विद्यार्थ्यांकडून चित्त थरारक प्रात्यक्षिके करून घेण्यात आली. आग लागल्यानंतर अग्निशामकाद्वारे सदरील आग कशी आटोक्यात आणावी याचे देखील प्रात्यक्षिकद्वारे विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.सहभागी विद्यार्थ्यांना नागरी संरक्षण विभागातर्फे प्रमाणपत्र देण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष भिमराव खलाणे, प्राचार्य भूषण खलाणे, समन्वयक स्वाती खलाणे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्हि.एस.देवरे यांनी केले तर आभार प्रदर्शन पी.बी. महाजन यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी एस. बी.वाघ, डि.एस.महाजन, पी.व्ही. बागुल यांनी परिश्रम घेतले.