Breaking
जळगावधुळेनंदुरबारनाशिकमहाराष्ट्र

सहाय्यक वनसंरक्षक आणि वनपाल १० हजार रुपयांची लाच स्वीकारतांना नाशिक एसीबीच्या जाळ्यात

0 7 5 0 2 9

उपसंपादक – कल्पेश महाले

नाशिक – कारवाईत पकडलेले लाकूड आणि मालवाहू वाहन दंडात्मक कारवाई करून मालासह सोडून देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी सहाय्यक वनसंरक्षक शिरीषकुमार निरभवणे आणि वनपाल सुरेश चौधरी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.

पुरूष तक्रारदार हे ३४ वर्षीय असून साक्षीदाराच्या शेतातील जांभूळ आणि सादडाच्या जुन्या वाळलेल्या झाडाचे लाकूड मालवाहू पिकअप क्र. एम.एच.०४ ए.एस.८०७७ या वाहनातून घेऊन इगतपुरीजवळील गोंदे येथील पेपर मीलमध्ये विक्रीसाठी निघाला होता. सहाय्यक वनसंरक्षक तथा उपवनसंरक्षक शिरीषकुमार निरभवणे, वनपाल सुरेश चौधरी आणि कावेरी पाटील यांनी ही गाडी पकडली होती. ३१ जानेवारी रोजी ही कारवाई करण्यात आली होती. कारवाईनंतर वाहन मालासह म्हसरूळ येथील वनविभागाच्या कार्यालयात आणले गेले. तक्रारदार व साक्षीदाराने वाहन सोडण्याची विनंती केली. तेव्हा सहाय्यक वनसंरक्षक शिरीषकुमार निरभवणे यांनी वनपाल सुरेश चौधरी याच्यामार्फत २ हजार रुपये दंड आणि १० हजार रुपयांची लाच मागितली.

तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नव्हती. त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यानंतर सापळा रचण्यात आला. तक्रारदाराने ही रक्कम वनपाल सुरेश चौधरी याच्याकडे दिली. पंचासमक्ष १० हजार रुपयांची लाच स्वीकारून सहाय्यक वनसंरक्षक निरभवणे यांच्याशी संपर्क साधून आपल्याकडे ही रक्कम मिळाल्याचे कळविले. त्यास निरभवणे यांनी होकार देत त्यांना गाडीचे आदेश घेण्यासाठी पाठवून देण्याची भ्रमणध्वनीवर सूचना केली.

या प्रकरणी सहाय्यक वनसंरक्षक शिरीषकुमार निरभवणे आणि वनपाल सुरेश चौधरी यांच्याविरुद्ध वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकारीच लाचखोरीत सापडल्याने वनविभागाच्या वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.

यांच्या पथकाने केली कारवाई 

लाचलुचपत प्रतिबंधक नाशिक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी म्हणून पोलीस उपअधीक्षक एकनाथ पाटील यांनी काम पाहिले. सापळा पथकात हवालदार सुनील पवार, पोलीस नाईक योगेश साळवे व विनोद पवार यांचा समावेश होता.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 5 0 2 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे