जळगाव शहरातील दुचाकी आणि मोबाईल चोरांना स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद.

(उपसंपादक – कल्पेश महाले)
जळगाव:- जळगाव शहरात दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्यामुळे, पोलीसांनी या गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी कठोर पावले उचलली होती. दि. १ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी ३ वाजता पिंप्राळा हुडको भागात शोएब अफजलखान पठाण,वय-२३ आणि शेख आवेश शेख मोहम्मद, वय-२१ या दोघांना संशयास्पद परिस्थितीत पकडण्यात आले. चौकशी दरम्यान, शोएब पठाणने जळगाव शहरातील विविध ठिकाणांहून मोटारसायकली आणि मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली. त्यांनी कोर्ट चौकातून जुपिटर कंपनीची दुचाकी, सुभाष चौकातून एच.एफ. डिलक्स दुचाकी आणि नेहरू चौकातून बजाज प्लॅटिना दुचाकी चोरी केली होती. तसेच खोटेनगर येथील एका घरातून सॅमसंग गॅलेक्सी मोबाईल चोरल्याची कबुली दिली.
चोरी केलेली दोन दुचाकी आणि मोबाईल शेख आवेश शेख मोहम्मद याला विकल्याचे आरोपींनी सांगितले. तपासात हेही निष्पन्न झाले की एक दुचाकी अल्तमेश शे. सलीम रा. पिप्राळा याला विकली होती. या तपासादरम्यान दोन मोटारसायकली आणि एक मोबाईल जप्त करण्यात आला. या आरोपींनी जळगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीतून २, शनिपेठ पोलीस स्टेशन हद्दीतून १ आणि जळगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीतून १ मोबाईल चोरी केले होते. या कारवाईमुळे जळगाव शहरातील चार चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
दुचाकी चोरीच्या तपासासाठी पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकामधे स.फौ.रवि नरवाडे, संजय हिवरकर, पो.हे.कॉ. संघपाल तायडे, मुरलीधर धनगर, हरीलाल पाटील, प्रविण भालेराव यांचा समावेश होता.
सदरील कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन अव्हाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.